मँचेस्टर - भारताकडे जागतिक दर्जाचे फलंदाज असून त्यांच्यापुढे गोलंदाजांना अचूक गोलंदाजी करावी लागेल, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याने दिली आहे. मार्क वूड पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला सुरूवात होण्याआधी झालेल्या व्हर्चुअल पत्रकार परिषदेत बोलत होता.
मार्क वूड म्हणाला, भारताकडे जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत. तुम्ही जर भारताचा फलंदाजी क्रम पाहिला तर यात तुम्हाला सर्व खेळाडू एका पेक्षा एक चांगले पाहायला मिळतील. रोहित शर्मा एक सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये गोलंदाजी करणे कठीण ठरते.
के एल राहुलने मला खूप प्रभावित केलं. तो चांगले चेंडू सोडतो. क्रीझवर तळ ठोकून त्याने खरेचं चांगली फलंदाजी केली. सलामीवीरची विकेट आमच्यासाठी दोन मोठ्या विकेट आहेत. यानंतर तुमच्यासमोर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली असतात. क्रिकेटच्या सर्व प्रकारात मी ज्या फलंदाजांना गोलंदाजी केली. यात विराट कोहलीला बाद करणे सर्वात कठीण राहिलं आहे. सांगायचे झाल्यास त्यांच्याकडे जागतिक दर्जाचे एकापेक्षा एक चांगले फलंदाज आहे. तुम्हाला जर यांना बाद करण्यासाठी स्वत:वर विश्वास नसेल तर खेळण्याचा काही फायदा नाही, असे देखील मार्क वूड म्हणाला.