मुंबई -भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा निर्णायक कसोटी सामना मँचेस्टर येथे रंगणार होता. परंतु या सामन्याच्या नाणेफेकीला 90 मिनिटाचा कालावधी शिल्लक होता. तेव्हा भारतीय संघाने सामना खेळण्यास नकार दिला. यामुळे सामना रद्द करण्यात आला. भारतीय संघाचे ज्यूनियर फिजीयो योगेश पारमार कोरोनाबाधित आढळले. यामुळे भारतीय संघाने सामना खेळण्यास नकार दिला. दरम्यान, यानंतर इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी आयपीएल 2021 मुळे भारतीय संघाने सामना खेळण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप केला. आता यावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
द टेलिग्राफच्या हवाल्याने सौरव गांगुलींनी सांगितलं की, खेळाडूंनी सामना खेळण्यास नकार दिला. पण तुम्ही त्यांना दोष देऊ शकत नाही. फिजिओ योगेश पारमार खेळाडूंच्या संपर्कात आले होते. त्यांनी खेळाडूंचा मसाज देखील केला होता. यामुळे खेळाडूंना कोरोनाची भिती वाटत होती. बायो बबलमध्ये राहणे सोपे नाही. खेळाडूंच्या भावनाचा आदर केला पाहिजे.