बर्मिंगहॅम: जॉनी बेअरस्टो ( Johnny Bairstow ) आणि जो रूट यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीच्या ( IND vs ENG 5th Test ) चौथ्या दिवशी सोमवारी इंग्लंड संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला. विजयासाठी 378 धावांच्या कठीण लक्ष्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडने दुसऱ्या डावात 3 बाद 259 अशी आक्रमक सुरुवात केली. त्यांना आता मालिकेत बरोबरी साधण्यासाठी 119 धावांची ( England need 119 runs ) गरज आहे. रूट 112 चेंडूत 76 तर बेअरस्टोने 87 चेंडूत 72 धावांवर खेळत आहेत. दोघांनी 197 चेंडूत 150 धावांची भागीदारी केली आहे.
इंग्लंडची धावसंख्या एकवेळेस बिनबाद 107 अशी होती, परंतु भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने ( Captain Jaspreet Bumrah ) अॅलेक्स लीस आणि जॅक क्रॉलीच्या विकेट्स घेत धावसंख्या तीन बाद 109 अशी कमी केली. लीस 65 चेंडूत 56 धावा करून बाद झाला आणि क्रॉलीने 76 चेंडूत 46 धावा केल्या. हनुमा विहारीने 14 धावांवर बेअरस्टोला जीवदान दिले, जे भारताला महागात पडले. बेन स्टोक्स आणि सॅम बिलिंग्स हे देखील इंग्लंडकडून फलंदाजीसाठी अद्याप मैदानात उतरलेले नाहीत. अशा स्थितीत भारताला विजयासाठी काही चमत्काराची अपेक्षा करावी लागेल.
दुसऱ्या सत्राच्या अखेरीस जसप्रीत बुमराहने जॅक क्रॉलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यानंतर भारताला पहिले यश मिळाले. लीस धावबाद झाला तर ओली पोप विकेटच्या मागे झेलबाद झाला. यानंतर बेअरस्टो आणि रूट ( Joe Root ) यांनी संघाचा मोर्चा सांभाळला. तत्पूर्वी, दुस-या डावात उपाहारानंतर भारतीय संघ 8.5 षटकांत 245 धावांत आटोपला होता. ऋषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने उपाहारापर्यंत 361 धावांची आघाडी घेतली होती.