महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Ind Vs Eng : भारताचे इंग्लंडसमोर विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य, शमी-बुमराह जोडीची झुंजार फलंदाजी - भारत

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

2nd Test: Shami's maiden half-century helps India set 260 runs target for England
Ind Vs Eng : भारताचे इंग्लंडसमोर विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य, शमी-बुमराह जोडीची झुंजार फलंदाजी

By

Published : Aug 16, 2021, 6:40 PM IST

लंडन - भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर खेळवण्यात येत असलेला दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघाने दुसऱ्या डावात ६ गडी बाद १८१ धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी सकाळी ऋषभ पंत (२२) लवकर बाद झाला. त्यानंतर भारताचा डाव लवकर आटोपणार असे सर्वांना वाटत होते. तेव्हा जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी नवव्या गड्यासाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी उभारली. मोहम्मद शमीने दमदार खेळी केली. त्याने नाबाद 56 धावा केल्या. तर जसप्रीत बुमराह 34 धावांवर नाबाद राहिला. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव 298 धावांवर घोषित केला आणि इंग्लंडला विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य मिळाले.

दुसऱ्या डावात के. एल. राहुल आणि रोहित शर्मा या जोडीला दुसऱ्या डावात मोठी सलामी देता आली नाही. मार्क वूडने राहुलला (5) बाद करत भारताला पहिला धक्का दिला. उजव्या यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूवर राहुलच्या बॅटची कड घेऊन तो यष्टीरक्षक जोस बटलरच्या हातामध्ये विसावला. दुसरीकडे रोहित शर्माने (21) डावाला आत्मविश्वासाने प्रारंभ केला. त्याने मार्क वूडच्या पुढच्याच षटकात षटकार खेचला. परंतु अखेरच्या चेंडूवर नियंत्रित फटका खेळण्यात तो अपयशी ठरला.

भारतीय कर्णधार विराट कोहलीकडून भारताला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु ती अपेक्षा फोल ठरली. सॅम कुरेनच्या उजव्या यष्टीवरील चेंडूवर तो जोस बटलरकरवी झेल बाद झाला. त्याने 20 धावा केल्या आणि उपाहारापर्यंत भारताची अवस्था 3 बाद 56 अशी झाली.भारताची अनुभवी जोडी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी दुसरे सत्रात संयमी फलंदाजी केली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 100 धावांची भागिदारी केली. पण मार्क वूडने पुजाराला बाद करून ही जोडी फोडली. पाठोपाठ अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा (3) फिरकीपटू मोईन अलीच्या जाळ्यात अडकले.

आघाडीचे तीन फलंदाज 55 धावांत माघारी परतले होते. तेव्हा चेतेश्वर पुजारा (45 धावा) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (61) यांनी चिवट झुंज देत भारताचा डाव सावरला. परंतु अखेरच्या सत्रात या दोघांसह रविंद्र जडेजासुद्धा बाद झाला. यामुळे भारतीय संघ संकटात सापडला. अंधूक सूर्य प्रकाशामुळे चौथ्या दिवशी खेळ लवकर थांबवण्यात आला. पाचव्या दिवशी ऋषभ पंत बाद झाल्यानंतर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या जोडीने झुंजार खेळी केली. त्याच्या भागिदारीमुळे भारतीय संघाला या सामन्यात वापसी करण्याची संधी मिळाली.

संक्षिप्त धावफलक

  • भारत (पहिला डाव) : 364
  • इंग्लंड (पहिला डाव) : 391
  • भारत (दुसरा डाव) : 109.3 षटकांत 8 बाद 298

ABOUT THE AUTHOR

...view details