तिरुवअनंतपुरम IND vs AUS Second T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दुसरा सामना आज तिरुवअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. परंतु, या सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच शनिवारी इथं मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळं संपूर्ण मैदान पाण्यानं भरल्याचं दिसून आलं होतं. खेळपट्टी झाकलेली असली तरी चिंतेची बाब म्हणजे आज सामन्याच्या दिवशीही हवामान विभागानं पावसाची शक्यता वर्तविली आहे.
वादळांसह मुसळधार पावसाची शक्यता : तिरुवअनंतपुरममध्ये आज सकाळीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुपारपर्यंत 55 टक्के पावसाची शक्यता आहे. या काळात वादळांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु, संध्याकाळी हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे. या परिस्थितीत चाहत्यांना संपूर्ण सामन्याचा थरार पाहायला मिळू शकतो.
धावांचा पाठलाग करताना संघ यशस्वी : तिरुवअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आतापर्यंत तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये दोन वेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी 8-8 गडी राखून सहज विजय मिळवलाय. तर एका सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं बाजी मारलीय. मात्र हा विजय केवळ 6 धावांनीच झालाय. अशा स्थितीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणं हा विजयाचा मार्ग असू शकतो हे स्पष्ट आहे.
2-0 ने आघाडी घेण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानात : भारतीय संघानं पाच सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघ आपली पहिली द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरलाय. मात्र, या मालिकेसाठी संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव या टी 20 मालिकेचं नेतृत्व करत आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. या सामन्यात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा 2 गडी राखून पराभव केला होता. कर्णधार सूर्यकुमार यादवनं स्वत: चमकदार कामगिरी करत 80 धावांची दमदार खेळी केली. मात्र, या सामन्यात संघाची गोलंदाजी चिंतेचा विषय ठरली आणि ती चांगलीच महागात पडली होती. मुकेशशिवाय अन्य कोणताही गोलंदाज प्रभावी ठरला नव्हता. अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या टी 20 सामन्यात त्या चुकांची पुनरावृत्ती न करण्याचा प्रयत्न करेल आणि सलग दुसरा विजय नोंदवून मालिकेत आपली आघाडी अधिक मजबूत करेल, अशी भारतीय क्रिकेटरसिकांना आशा आहे.
दोन्ही संघ यातून निवडणार :
- भारत :सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार
- ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेव्हिड, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, जोश इंग्लिस, तन्वीर संघा, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झम्पा.
हेही वाचा :
- भारताचा कांगारुंवर ऐतिहासिक विजय, रिंकू सिंगसह ऋतुराज गायकवाडचे ठरले बॅडलक
- नवा भिडू, नवा राज! विश्वचषक अंतिम सामन्याच्या 96 तासांनी विश्वविजेत्यांशी भिडणार भारतीय संघ, पहा मालिकेचं वेळापत्रक