नवी दिल्ली :ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 कसोटी मालिकेतील पहिला सामना आज गुरूवारी 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. गुरुवारी सकाळी 9.30 वाजता नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 साठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. पहिल्या कसोटीबद्दल इथल्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. कारण नागपूर स्टेडियममध्ये आतापर्यंत ४० हजारांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे.
४० हजारांहून अधिक तिकिटांची विक्री :सामना सुरू होण्याआधी नागपूर स्टेडियममध्ये आतापर्यंत ४० हजारांहून अधिक तिकिटांची विक्री होणे ही खूप मोठी बाब आहे. त्यामुळे सामना पाहण्यासाठी येथे लोकांची गर्दी होणार आहे हे निश्चित. हा सामना खूपच रोमांचक होऊ शकतो. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ आपली पूर्ण ताकद पणाला लावणार आहेत. या कसोटी मालिकेतील दुसरा सामना १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटीत दोन्ही संघ हा सामना जिंकून मालिकेत बाजी मारण्याचा प्रयत्न करतील. टीम इंडिया विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतशिवाय मैदानात उतरणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला पंतचा तोटा जाणवणार आहे. त्याच्या जागी श्रीकर भारत ला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर जोश हेडलवूड आणि मिचेल स्टार्क हे दोन वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियन संघात खेळणार नाहीत. यासोबतच अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला ऑस्ट्रेलिया संघात खेळवण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.