नवी दिल्ली : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आपला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या केएस भरतने पहिल्या दिवशी शानदार विकेटकीपिंग केली. त्याने पहिल्याच दिवशी मार्नस लबुशेनला यष्टीचीत केले. लबुशेन क्रीजमधून बाहेर येताच त्याने चपळाईने स्टंप्स उडवले. त्यानंतर लबुशेनला बाद घोषित करण्यात आले. त्याचा स्टंपींगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्याची चपळता पाहून लोक आता त्याची तुलना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी करू लागले आहेत.
धोनीसारखी स्टंपिंगची पद्धत : आपल्या पहिल्या सामन्यातच केएस भरत एमएस धोनीप्रमाणे विकेटच्या मागे खूप सतर्क दिसत होता. एका चेंडूवर मार्नस लबुशेनचा पाय क्रिजच्या थोडासा बाहेर आला आणि भरतने विलंब न लावता वेगाने त्याचे स्टंप्स विखुरले. हे पाहून लबुशेनला देखील आश्चर्य वाटले. भरतची स्टंपिंगची पद्धत धोनीसारखीच आहे. विकेटकीपिंग कोचिंगमध्ये असे शिकवले जाते की बॉलच्या स्पिनला मात देम्यासाठी आधी हात मागे घ्या आणि नंतर बेल्स उडवा. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भरत या तंत्राचा वापर करताना दिसला.
2018 मध्ये भारत अ संघाकडून पदार्पण : केएस भरतने 86 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 4707 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 9 शतके आणि 27 अर्धशतके झळकावली आहेत. तर लिस्ट ए च्या 64 सामन्यात त्याने 1950 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 5 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. केएस भरतने कसोटी पदार्पणानंतर कारकिर्दीतील यशाचे श्रेय त्याचे प्रशिक्षक जय कृष्ण राव आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना दिले आहे. केएस म्हणाला की, येथे पोहोचण्यापूर्वी मी 2018 मध्ये भारत अ संघाकडून पदार्पण केले होते. त्यावेळी राहुल द्रविड सर संघाचे प्रशिक्षक होते. यानंतर, मी जेव्हा भारत अ संघाकडून इंग्लंडमध्ये खेळायचो तेव्हा राहुल सरांशी खूप बोलायचो. राहुल सर आम्हाला आमचा खेळ पुढच्या स्तरावर कसा न्यायचा याविषयी गाइड करायचे.
पहिल्या दिवशीचा खेळ : सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने 1 विकेट गमावून 77 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने एकमेव विकेट घेतली. त्याने केएल राहुलला 20 धावांवर बाद केले. कर्णधार रोहित शर्मा (56) आणि आर अश्विन (0) खेळपट्टीवर नाबाद आहेत. दोघेही आज सकाळी साडेनऊ वाजता डावाला सुरुवात करतील. भारत ऑस्ट्रेलियापेक्षा 100 धावांनी मागे आहे.
हेही वाचा :Ind vs Aus Test Series 2023 : सूर्यकुमार यादव आणि केएस भारतचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण; माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून कसोटी कॅप