अहमदाबाद : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या दिवशी चांगली सुरुवात केली. पहिल्या सत्रात अश्विनने सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला (32) बाद करून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. अश्विनपाठोपाठ मार्नस लबुशेनला (3) मोहम्मद शमीने धावबाद केले. भारतीय गोलंदाजांना पहिल्या सत्रात केवळ दोनच बळी घेता आले.
उस्मान ख्वाजाने कसोटीतील 13वे शतक पूर्ण केले : दुसऱ्या सत्रात उस्मान आणि स्टीव्ह या जोडीने शानदार खेळी खेळली. स्टीव्ह स्मिथला रवींद्र जडेजाने 38 धावांवर धावबाद केले. मोहम्मद शमीने पीटर हँड्सकॉम्बला (17) क्लीन बोल्ड केले. पहिल्या दिवशी कांगारूंनी चार गडी गमावून 255 धावा केल्या होत्या. सलामीवीर उस्मान ख्वाजाने कसोटीतील 13वे शतक पूर्ण केले. उस्मान 104 आणि कॅमेरून ग्रीन 49 धावांवर खेळत आहेत.
भारताला शेवटची कसोटी जिंकावीच लागेल : नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम आहे. फिरकीपटू अश्विन आणि जडेजा यांना आतापर्यंत प्रत्येकी एकच बळी घेता आला आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमीने दोन विकेट्स घेतल्या आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये पोहोचण्यासाठी भारताला शेवटची कसोटी कोणत्याही परिस्थितीत जिंकावीच लागेल. तिसरा कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
नरेंद्र मोदींनी खेळाडूंची भेट घेतली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (WTC 2023) चा अंतिम सामना 7-11 जून रोजी लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळवला जाईल. WTC मध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे गुरूवारी सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. मोदी आणि अल्बानीज यांनी बराच वेळ स्टेडियममध्ये थांबून सामना पाहिला. नरेंद्र मोदींनी भारतीय कर्णधार रोहित शर्मा, फलंदाज विराट कोहली आणि इतर खेळाडूंची भेट घेतली.
हेही वाचा :WPL Today Fixtures : डब्ल्यूपीएलचा 8वा सामना होणार आरसीबी आणि यूपी वॉरियर्ससोबत, आरसीबी पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर