रायपूर IND vs AUS 4th T 20 :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आज रायपूर इथल्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघ या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. तसंच गुवाहाटीत खेळल्या गेलेल्या मागील सामन्यात भारतीय संघाच्या जबड्यातून विजय हिसकावून घेणारा ग्लेन मॅक्सवेल या सामन्यात खेळणार नाही. यामुळं भारतीय संघाची डोकेदुखी कमी झालीय. भारतीय संघासाठी आणखी एक दिलासा म्हणजे या सामन्यासाठी श्रेयस अय्यर भारतीय संघात दाखल झालाय.
खेळपट्टी कशी असेल : रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय संघ तब्बल 11 महिन्यांनंतर सामना खेळणार आहे. यापूर्वी, यावर्षी 21 जानेवारी रोजी भारतीय संघानं या मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला होता. या मैदानावर जसजसा सामना पुढं सरकतो, तसतशी खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरु लागते. अशा स्थितीत, फलंदाजाला सुरुवातीच्या काळात वेगवान गोलंदाजांना सांभाळून खेळावं लागेल तसंच जसजसा सामना पुढं जाईल तसं फिरकीपटूंनाही सांभाळून खेळावं लागेल.
भारताला इतिहास रचण्याची संधी : भारतानं आतापर्यंत टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळल्या गेलेल्या 212 सामन्यांपैकी पैकी 135 सामने जिंकले आहेत. तर 67 सामन्यात पराभवाचा सामना केलाय. 4 सामने बरोबरी आणि 6 सामन्यांचा निकाल लागला नाही. तर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्ताननं 226 सामने खेळून तेवढेच सामने जिंकले आहेत. मात्र भारताचं विजयाचे प्रमाण पाकिस्तानपेक्षा खूप जास्त आहे. टी 20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं विजयाचे प्रमाण 2.014 आहे, तर पाकिस्तानचं फक्त 1.646 आहे. जर भारतानं आज चौथ्या टी 20 मध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तर तो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक 136 सामने जिंकणारा संघ बनेल. आजपर्यंत टी 20 क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही संघानं हा टप्पा गाठलेला नाही.
आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ :
- भारत- 135
- पाकिस्तान- 135
- न्यूझीलंड- 102
- दक्षिण आफ्रिका - 95
- ऑस्ट्रेलिया- 94
- इंग्लंड - 92
- श्रीलंका- 79
- वेस्ट इंडिज- 76
- अफगाणिस्तान- 74
- भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर/तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग/दीपक चहर, प्रसीद्ध कृष्णा/आवेश खान, मुकेश कुमार
- ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, बेन मॅकडरमॉट, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार, यष्टिरक्षक), ख्रिस ग्रीन, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा
हेही वाचा :
- T20 विश्वचषकासाठी 20 संघ भिडणार; पुढील वर्षी होणार स्पर्धा, कशा पद्धतीनं होणार विश्वचषक ?
- टी 20 विश्वचषकांनतर भारतीय क्रिकेट संघ करणार श्रीलंकेचा दौरा; पाहा मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक
- Ind Vs Aus T20 : मॅक्सवेलचा दणका, ऑस्ट्रेलियाचा भारतावर ५ गडी राखून विजय; ऋतुराजचं शतक व्यर्थ