नवी दिल्ली :बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. शुक्रवारी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव 263 धावांवर आटोपला. भारत आज आपला पहिला डाव खेळत आहे. भारताची धावसंख्या 58 षटकांत 153/7 आहे. सध्या अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन क्रीजवर आहेत. कर्णधार रोहित शर्मा (32), केएल राहुल (17), चेतेश्वर पुजारा (0), श्रेयस अय्यर (4), विराट कोहली (44), रविंद्र जडेजा (26) आणि केएस भरत (6) बाद झाले आहेत.
भारताचा पहिला डाव :भारताच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. राहुल पुन्हा एकदा स्वस्तात तंबुत परतला. त्याला 17 धावांवर नॅथन लॉयनने एलबीडब्ल्यू आऊट केले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा देखील त्याला सुरुवातीला मिळालेल्या चांगल्या स्टार्टला मोठ्या खेळीत परावर्तीत करू शकला नाही. तो 32 धावांवर लॉयनच्या गोलंदाजीत बोल्ड झाला. रोहित पाठोपाठ पुजारा आणि अय्यरही आउट झाले. त्या दोघांनाही लॉयननेच बाद केले. टॉड मर्फीने रवींद्र जडेजाला एलबीडब्ल्यू आऊट केले. जडेजाने 26 धावा केल्या. मॅथ्यू कुहनेमनने विराट कोहलीला पॅव्हेलियन पाठवले. कोहलीही एलबीडब्ल्यू आऊट झाला
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव :दिल्ली कसोटीत नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा संपूर्ण संघ भारतीय गोलंदाजांसमोर एक दिवसही टिकू शकला नाही. मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि आर अश्विनने कांगारूंना सळो की पळो करून सोडले. त्यांचा संपूर्ण संघ 78.4 षटकांत 263 धावांत गारद झाला. डेव्हिड वॉर्नरने 15, उस्मान ख्वाजाने 81, मार्नस लॅबुशेनने 18, स्टीव्ह स्मिथने 0, ट्रॅव्हिस हेडने 12, अॅलेक्स केरीने 0, पॅट कमिन्सने 33, टॉड मर्फीने 0 आणि नॅथन लायनने 10 धावा केल्या. पीटर हँड्सकॉम्बने 142 चेंडूत 72 धावांची शानदार खेळी केली. हँड्सकॉम्बने डावात नऊ चौकार मारले.
भारतीय त्रिकुटासमोर कांगारू हतबल : शुक्रवारचा दिवस मोहम्मद शमी, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या नावावर राहिला. मोहम्मद शमीने चार विकेट घेतल्या. त्याने डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, नॅथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन यांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. तर रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. जडेजाने शानदार खेळी करणाऱ्या उस्मान ख्वाजा (81) ला आउट केले. त्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स (३३) आणि फिरकी गोलंदाज टॉड मर्फीलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अश्विननेही तीन विकेट घेतल्या. त्याने मार्नस लबुशेन, स्टीव्ह स्मिथ आणि अॅलेक्स कॅरी यांना बाद केले. अक्षर पटेलने 12 षटके टाकली मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही.
हेही वाचा :IPL 2023 Schedule : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या आवृत्तीचे वेळापत्रक जाहीर; पाहा सामन्यांची सविस्तर माहिती