नवी दिल्ली : भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळणार आहे. विशाखापट्टणमच्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्यात टीम इंडिया मालिका जिंकण्याच्या इराद्याने उतरणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 17 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून पराभव केला होता. या विजयानंतर भारतीय संघाचा उत्साह वाढला आहे. रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळला नव्हता पण आजच्या सामन्यात तो कर्णधारपदी असणार आहे.
केएल राहुल फॉर्ममध्ये परतला : कसोटी मालिकेतील खराब कामगिरीमुळे शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाबाहेर काढण्यात आलेला केएल राहुल वनडे मालिकेत फॉर्ममध्ये परतला आहे. शुक्रवारी राहुलने त्याच्या नाबाद 75 धावांच्या खेळीने टीकाकारांना शांत केले आहे. गुडघ्याची दुखापत आणि त्यानंतर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे जवळपास आठ महिन्यांनी एकदिवसीय क्रिकेट खेळणारा जडेजाही रंगात दिसत आहे. जडेजाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 45 धावांची नाबाद खेळी केली. त्याचबरोबर त्याने 46 धावांत दोन बळीही घेतले. भारतीय वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनीही गेल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. शमी आणि सिराजने प्रत्येकी तीन, जडेजाने दोन आणि हार्दिक पांड्या व कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.