बंगळुरु IND vs AFG T20I : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी 20 सामन्याचा निकाल एक नाही तर दोन सुपर ओव्हरमध्ये लागला. निर्धारित 20 षटकांत दोन्ही संघांनी 212 धावा केल्यानंतर सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर पहिला सुपर ओव्हर झाला. पहिल्या सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. पुन्हा एकदा सामना टाय झाला. त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतानं 10 धावांनी विजय मिळवला. रवी बिश्नोईनं भारतासाठी दुसरे सुपर ओव्हर टाकत अवघ्या तीन चेंडूत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
- बिश्नोई ठरला हिरो : दुसऱ्या सुपरमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं 11 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना रवी बिश्नोईनं अफगाणिस्तानला केवळ 1 धाव करु दिली. त्यामुळे सामना भारताच्या बाजूनं झुकला. बिश्नोईनं अवघ्या तीन चेंडूत 2 विकेट घेत अफगाणिस्तानचा पराभव केला.
कर्णधार रोहितचं दमदार शतक :बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 4 गडी गमावून 212 धावांचा डोंगर उभारला. भारतीय कर्णधार रोहित शर्मानं 69 चेंडूत नाबाद 121 धावांची सर्वात मोठी खेळी केली. यात 11 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. याशिवाय रिंकू सिंगनं 39 चेंडूत 2 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 69 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून वेगवान गोलंदाज फरीद अहमदनं सर्वाधिक तीन बळी घेतले.
अफगाणिस्तानच्याही 212 धावा : त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या अफगाणिस्ताननं 20 षटकांत 6 विकेट गमावत 212 धावा करत सामना बरोबरीत सोडवला. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नईबनं नाबाद 55 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. यात 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. याशिवाय सलामीला आलेल्या रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झादरान यांनी 50-50 धावा केल्या. दरम्यान, भारताकडून वॉशिंग्टन सुंदरनं सर्वाधिक 3 बळी घेतले.