इंदूर IND vs AFG T20 :यशस्वी जयस्वाल (68) आणि शिवम दुबेच्या (नाबाद 63) अर्धशतकांच्या जोरावर भारतानं रविवारी अफगाणिस्तानविरुद्धचा दुसरा टी 20 सामना सहा गडी राखून जिंकला. या विजयासह टीम इंडियानं तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
अर्शदीपचे तीन बळी : होळकर स्टेडियमवरील दुसऱ्या T20I सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानसाठी गुलबदिन नायब (35 चेंडूत 57) या एकमेव फलंदाजानं अर्धशतक झळकावलं. त्याच्या खेळीमुळे संघाला एकूण 172 धावा करता आल्या. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 32 धावांत 3 बळी घेतले. तर फिरकीपटू रवी बिश्नोई (29 धावांत 2) आणि अक्षर पटेल (17 धावांत 2 बळी) यांनी त्याला उत्तम साथ दिली.
जयस्वाल-दुबेची शानदारी खेळी : धावांचा पाठलाग करताना भारताचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्मा (0) स्वस्तात तंबूत परतला. तर 14 महिन्यांनंतर राष्ट्रीय टी-20 संघात पुनरागमन करणारा स्टार फलंदाज विराट कोहली 29 धावा करण्यात यशस्वी झाला. मात्र, घरगुती क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे या डावखुऱ्या जोडीनं मेन इन ब्लूसाठी पाठलाग करणं सोपं केलं. यशस्वीनं 34 चेंडूत 68 धावा केल्या, तर दुबेनं अवघ्या 32 चेंडूत 63 धावा ठोकल्या. यष्टिरक्षक जितेश शर्मा शून्यावर बाद झाला. अखेर दुबेनं अष्टपैलू रिंकू सिंगच्या मदतीनं (9 चेंडूत नाबाद 9 धावा) संघाला विजय मिळवून दिला.