लखनऊWorld Cup 2023 :भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली यंदाच्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात चमकदार कामगिरी करत आहे. मात्र रविवारी लखनौच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर विराटला इंग्लंडविरुद्ध चमकदार कामगिरी करता आली नाही. विराट शून्यावर बाद झाला. विराटकडून त्याचं एकदिवसीय कारकिर्दीतलं 49वं शतक इंग्लंडविरुद्ध झळकावेल आणि सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांची बरोबरी होईल, अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र 9 चेंडू खेळूनही तो शून्यावर आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. यासोबतच त्यानं सचिन तेंडुलकरच्या आणखी एका विक्रमाची बरोबरी केलीय.
विराटनं केली सचिनच्या विक्रमाची बरोबरी : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद होऊन विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट होण्याच्या विक्रमाचीही बरोबरी केलीय. यासह विराट हा सचिन तेंडुलकरसह संयुक्तपणे भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे. तो जास्तीत जास्त शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताकडून झहीर खान सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाला आहे.
सर्वाधिक वेळा आऊट होणारे भारतीय खेळाडू :
- झहीर खान - 43
- इशांत शर्मा - 40
- हरभजन सिंग - 37
- अनिल कुंबळे - 35
- विराट कोहली - 34
- सचिन तेंडुलकर - 34
- वीरेंद्र सेहवाग - 31
- सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट होणारे भारतीय फलंदाज : भारताकडून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांबद्दल बोलयचं झालं तर विराट कोहली आता पहिल्या क्रमांकावर पोहोचलाय. त्याच्यानंतर या यादीत फक्त सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग आहेत.