हैदराबाद World Cup 2023 Prize Money : विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची उत्सूकता शिगेला पोहोचलीय. अवघ्या काही तासांच्या प्रतीक्षेनंतर जगाला एकदिवसीय क्रिकेटचा विश्वविजेता मिळणार आहे. गेल्या 45 दिवसांत भारताच्या 10 स्टेडियममध्ये एकूण 47 सामन्यांनंतर या स्पर्धेतील दोन सर्वोत्तम संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत. आज जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकासाठी अंतिम लढत होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 2023 च्या विश्वचषकाचा मुकूट कोणाच्या पदरात पडणार हे लवकरच कळेल, पण विजेत्या संघाला विश्वविजेतेपदाशिवाय काय मिळणार? या विश्वचषकात प्रत्येक संघावर पैशांचा वर्षाव होणार आहे. विशेषत: अंतिम फेरीत पोहोचणारे दोन्ही संघ श्रीमंत होणार आहे.
फायनल जिंकणाऱ्या संघाला किती बक्षीस : 2023 च्या विश्वचषकाचं विजेतेपद जिंकणारा संघ श्रीमंत होईल. आयसीसीने विजेत्यासाठी 4 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस ठेवल्यामुळं अंतिम फेरीत जिंकणाऱ्या संघाचा प्रत्येक खेळाडू करोडपती होईल असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. म्हणजेच विश्वचषक 2023 ची अंतिम फेरी जिंकणाऱ्या संघाला भारतीय रुपयांमध्ये 33.20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल. तर 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील उपविजेता किंवा अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाला विजेत्या संघाची अर्धी बक्षीस रक्कम म्हणजेच 2 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळतील. याचे मूल्य भारतीय रुपयात 16.60 कोटी रुपये आहे.
उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना किती रक्कम :दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडले असतील, पण त्यांना बक्षिसाची रक्कमही त्यांच्या किटमध्ये मिळेल. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना प्रत्येकी 8 लाख यूएस डॉलर्स मिळतील, जे भारतीय रुपयांमध्ये 6.64 कोटी रुपये आहेत. म्हणजेच दोन्ही संघांना मिळून 13 कोटींहून अधिकची बक्षीस रक्कम मिळेल. विश्वचषक 2023 मध्ये एकूण 10 संघांनी भाग घेतला. त्यापैकी 6 संघ बाद किंवा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि नेदरलँड्सचे संघ साखळी सामन्यांमध्येच स्पर्धेतून बाहेर पडले होते. साखळी सामन्यांमध्ये बाहेर पडलेल्या प्रत्येक संघाला एक लाख यूएस डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळेल, जी भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 83 लाख रुपये आहे. या 6 संघांना एकूण 6 लाख यूएस डॉलर म्हणजेच 4.98 भारतीय रुपये मिळतील.
लीग सामना जिंकल्यास बक्षीस :2023 च्या विश्वचषक स्पर्धेत 10 संघांमध्ये एकूण 45 सामने खेळले गेले. प्रत्येक संघानं 9 सामने खेळले. यावेळी आयसीसीनं प्रत्येक लीग मॅच जिंकण्यासाठी बक्षीस रक्कमही जाहीर केली होती. त्यानुसार, प्रत्येक लीग सामना जिंकण्यासाठी, विजेत्या संघाला 40 हजार डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळेल. जे भारतीय रुपयात अंदाजे 33.20 लाख रुपये आहे. म्हणजेच भारतीय संघानं आपले सर्व 9 लीग सामने जिंकले तर टीम इंडियाला प्रत्येक सामन्यासाठी 40 हजार अमेरिकन डॉलर्स मिळतील.
हेही वाचा :
- क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह! भारतानं विश्वचषक जिंकावं यासाठी पुण्यात विविध ठिकाणी महाआरती
- कोहलीचा जबरा फॅन! जितक्या कोहलीच्या धावा, हॉटेलमध्ये तितकीच बिर्याणीवर सूट
- अंतिम सामन्यात भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी 'क्रिकेटचा देव' अहमदाबादेत, काय म्हणाला सचिन?