हैदराबाद : World Cup २०२३ :भारत-न्यूझीलंडचा सामना 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथील HPCA स्टेडियममध्ये होणार आहे. या विश्वचषकात दोन्ही संघांची कामगिरी कमी-अधिक प्रमाणात सारखीच आहे. चारही सामने जिंकून दोन्ही संघ धर्मशालेत दाखल झाले आहेत. दोन्ही संघाचे 8 गुणही सारखेच आहेत. गुणतालिकेतील पहिल्या दोन संघांमध्ये भारत-न्यूझीलंड संघाचा समावेश आहे. या विश्वचषकात भारतीय संघाला पंसती दिली जात आहे. मात्र, गेल्या काही वर्षांची कामगिरी पहाता न्यूझीलंडचा संघ आघाडीवर दिसत आहे. विश्वचषकात भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्यांमध्ये कोणाचा दबदबा राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
न्यूझीलंडची कामगिरी चांगली : न्यूझीलंडचा संघ कधीही विश्वचषक जिंकू शकला नाही. न्यूझीलंड संघासाठी गेलं दशक खूपच अद्भूत राहिलं. या काळात ब्लॅककॅप्स म्हणून ओळखला जाणारा हा संघ 2015, 2019 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. यावेळीही संघाची कामगिरी उत्कृष्ट होती. भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामना जिंकून न्यूझीलंड संघ उपांत्य फेरीच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकू इच्छितो. विश्वचषकात न्यूझीलंड संघाची कामगिरी भारतीय संघापेक्षा चांगली झाली आहे. आतापर्यंत दोन्ही संघ विश्वचषकात 9 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी 5 वेळा न्यूझीलंड संघानं विजय मिळवला असून एक सामना पावसामुळं होऊ शकला नाही. यामध्ये 2019 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवाचाही समावेश आहे. ज्यामुळं टीम इंडियाचं विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगलं होतं. टीम इंडियानं विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडला फक्त तीन वेळा पराभूत केलं आहे.
विश्वचषक 1975 : पहिल्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान, दोन्ही संघांमध्ये खेळलेला पहिला सामना न्यूझीलंडच्या नावावर होता. जिथं 60 षटकांच्या सामन्यात टीम इंडियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली होती. त्यात भारतीय संघानं 230 केल्या होत्या. सय्यद आबिद अलीच्या 70 धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला खेळी खेळता आली नाव्हती. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघानं 58.5 षटकांत 6 गडी गमावून 233 धावा केल्या होत्या. ज्यात कर्णधार ग्लेन टर्नरनं 114 धावांची शानदार खेळी केली. तसंच त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं होतं.
विश्वचषक 1979 :1979 साली दुसऱ्या विश्वचषकात दोन्ही संघ पुन्हा भिडले. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. वेंकटराघवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 182 धावांवर बाद झाला होता. ज्यामध्ये सलामीवीर सुनील गावस्करनं 144 चेंडूत 55 धावांची खेळी खेळली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाचे सलामीवीर जॉन राईट, ब्रूस एडगर यांनी पहिल्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. जॉन राइटच्या (48), ग्लेन टर्नरच्या (43) धावांच्या जोरावर न्यूझीलंड संघानं 57 षटकात 2 गडी गमावून 183 धावा केल्या होत्या. यावेळी न्यूझीलंडनं टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर न्यूझीलंडच्या या विश्वचषक संघाचा भाग असलेले जॉन राइट हे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते.
विश्वचषक 1987 :हा विश्वचषक भारत- पाकिस्ताननं संयुक्तपणे आयोजित केला होता. या विश्वचषकात भारत-न्यूझीलंडचे संघ दोनदा भिडले. या सामन्यात दोन्ही वेळा भारतीय संघानं न्यूझीलंडचा पराभव केला होता. पहिला सामना बंगळुरूमध्ये खेळला गेला. ज्यात कपिल देवच्या नेतृत्वाखाली प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियानं 50 षटकात 252 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये नवज्योत सिद्धूच्या 75 धावांची खेळी केली होती. तसंच कपिल देवनं 58 चेंडूत 72 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात दमदार झाली होती, पण 50 षटकांत 8 गडी गमावून त्यांना केवळ 236 धावा करता आल्या. टीम इंडियानं हा सामना 16 धावांनी जिंकला होता. त्यावेळी कपिल देव यांना सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं होतं.
दोन खेळाडूं सामनावीर :1987 च्या विश्वचषकात भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना नागपुरात झाला होता. येवेळी सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामन्यात न्यूझीलंडच्या संघाला 50 षटकात 9 गडी गमावून 221 धावा करता आल्या. या सामन्यात भारतीय गोलंदाज चेतन शर्मानं हॅटट्रिक घेतली होती. विश्वचषकात अशी कामगिरी करणारा तो केवळ भारताचाच नव्हे, तर जगातील पहिला गोलंदाज होता. टीम इंडियाची त्या दिवशीची कामगिरी गतविजेत्याप्रमाणंच होती. सुनील गावस्करच्या 103 धावा, श्रीकांतच्या 75 धावांच्या जोरावर भारतीय संघानं हा सामना 9 विकेट्स राखून जिंकला होता. न्यूझीलंड संघानं 224 धावाचं दिलेलं लक्ष भारतीय संघानं केवळ 32.1 षटकात पूर्ण केलं होतं. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 136 धावा केल्या होत्या. श्रीकांत बाद झाल्यानंतर मोहम्मद अझरुद्दीनसह (41 धावा) सुनिल गावस्करांनी संघाला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात सुनील गावस्कर, चेतन शर्मा यांना सामनावीर म्हणून निवडण्यात आलं होतं. क्रिकेटच्या इतिहासात असे मोजकेच प्रसंग आले आहेत, जेव्हा दोन खेळाडूंना सामनावीर म्हणून निवडण्यात आलं होतं.