अहमदाबाद World Cup 2023 IND vs PAK : क्रिकेट विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात 'महासंग्राम' होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडं जगातील सर्व क्रिकेट शौनिकांचं लक्ष लागलंय. 1.25 लाख प्रेक्षकांची क्षमता असलेल्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान विरोधात मैदानात उतरणार आहे. हे दोन्ही संघ कागदावर तुल्यबळ वाटत असले, तरी भारतीय संघावर दडपण कमी असल्यामुळं पारडं जड आहे. आशिया चषकात भारताकडून पराभूत झाल्यानंतर विश्वचषकात सुरुवातीच्या दोन सामन्यात हवी तशी कामगिरी न केल्यामुळं पाकिस्तानचा संघ दडपणात आलाय. त्यातच पाकिस्तानच्या संघावर त्यांच्या माध्यमांनी आणि माजी खेळाडूंनी जोरदार टीकाही केलीय.
आतापर्यंतचा इतिहास काय : भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 134 सामने झाले आहेत. यात पाकिस्तानच्या संघानं 73 सामन्यांत विजय मिळवलाय. तर भारतीय संघानं 56 सामन्यात बाजी मारलीय. याचा अर्थ आतापर्यंतच्या एकदिवसीय सामन्यांत भारताला पाकिस्तानविरुद्ध 73 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलाय. ही आकडेवारी पाहता एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचं पारडं जड असल्याचं दिसत आहे. तर या दोन संघादरम्यान झालेल्या 5 सामन्याचा निकाल लागलेला नाही. एकदिवसीय इतिहासात पाकिस्तान संघाचं पारडं जड असलं, तरी विश्वचषकाच्या इतिहासात भारतच वरचढ राहिलाय. विश्वचषकात आतापर्यंत हे दोन्ही संघ सातवेळा आमनेसामने आलेत. या सर्व 7 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. भारताविरुद्ध पाकिस्तानला विश्वचषकातील एकही सामना जिंकता आला नाही. 2023 च्या विश्वचषकात पाकिस्तानचा पराभव करत भारत आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्याच्या तर पाकिस्तान विश्वचषकात भारताविरुद्ध पहिला विजय मिळविण्यासाठी मैदानात उतरेल.
पाकिस्तानविरुद्ध गिल खेळणार : पाकिस्तानविरोधातील सामन्यासाठी युवा सलामीवीर शुभमन गिल हा 99 टक्के तयार असल्याचं कर्णधार रोहित शर्मानं सांगितलंय. पाकिस्तानविरोधातील महामुकाबल्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्मानं गिलच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली. शुभमन गिल खेळण्यासाठी तयार असल्याचं रोहित शर्मानं सांगितलंय. डेंग्यू झाल्यामुळं गिल विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यात खेळू शकला नव्हता, पण आता त्यानं डेंग्यूवर मात केली असून तो लवकरच मैदानावर परतणार आहे. पाकिस्ताननिरोधात गिल मैदानात उतरल्यास भारताच्या फलंलादाजीची ताकद आणखी वाढणार आहे.