अहमदाबाद Cricket World Cup 2023 Final : भारतीय क्रिकेट संघ इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक 2023 चा अंतिम सामना आज गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघानं पूर्ण तयारी केली आहे. सरकारपासून ते बीसीसीआय आणि सेलिब्रिटी ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण आपापल्या परीनं विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी तयारी करत आहेत.
दोन्ही संघांचा स्पर्धेतील आतापर्यंतचा प्रवास : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी या विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केलीय. भारतीय संघ आतापर्यंत अजिंक्य राहिलाय. या विश्वचषकात भारताला पराभूत करण्यात कोणत्याही संघाला यश आलेलं नाही. भारतीय संघानं सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरी गाठलीय. उपांत्य फेरीतही भारतानं न्यूझीलंडला 398 धावांचे लक्ष्य दिलं होतं. हा सामना 70 धावांनी जिंकला होता. ऑस्ट्रेलियन संघानं स्पर्धेतील सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर अप्रतिम पुनरागमन केलं. त्यानंतर एकही सामना गमावला नाही. कांगारुंनी सलग 8 सामने जिंकून अंतिम फेरी गाठलीय. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. मात्र, या सामन्यात कांगारूंची फलंदाजी ढासळली. त्यानंतर निम्मा संघ अवघ्या 137 धावांत बाद झाला होता.
कोणते खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावणार : भारताकडून कर्णधार रोहित शर्मा संघाला वेगवान सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. विराट कोहली हा या विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक 711 धावा करणारा फलंदाज आहे. या विश्वचषकात त्याच्या नावावर 3 शतकं आणि 5 अर्धशतकं आहेत. अंतिम सामन्यातही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. मोहम्मद शामी हा चेंडूनं विरोधी संघावर सतत कहर करत आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात 7 विकेट घेत त्यानं 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताबही पटकावला. या स्पर्धेत अवघ्या 6 सामन्यात 23 बळी घेणारा शमी गोलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि अॅडम झम्पा या सामन्यात भारतासाठी आव्हान बनू शकतात. या विश्वचषकात डेव्हिड वॉर्नरनं ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत सर्वाधिक 528 धावा केल्या आहेत. अॅडम झम्पानं आपल्या संघाकडून सर्वाधिक 22 विकेट घेतल्या आहेत.