हैदराबाद World Cup 2023 ICC Playing 11 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) 2023 च्या विश्वचषक स्पर्धेची सर्वोत्तम प्लेइंग-11 जाहीर केलीय. सुमारे दीड महिना चाललेल्या या स्पर्धेत दमदार कामगिरीच्या जोरावर आयसीसीनं आपल्या प्लेइंग-11 मध्ये तब्बल 6 भारतीय खेळाडूंचा समावेश केलाय. आश्चर्याची बाब म्हणजे चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स यालाच या संघातून बाहेर ठेवण्यात आलंय. आयसीसीनं भारतीय कर्णधार रोहित शर्माला या सर्वोत्तम संघाचा कर्णधार बनवलंय.
सहा भारतीय खेळाडूंचा समावेश : कर्णधार रोहित शिवाय उर्वरित 5 भारतीयांमध्ये भारतीय फलंदाज विराट कोहली, यष्टीरक्षक के एल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचा समावेश करण्यात आलाय. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गिराल्ड कोएत्झी याला 12 वा खेळाडू म्हणून संघात ठेवण्यात आलंय.
पाकिस्तान-इंग्लंडचा एकही खेळाडू नाही : भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज सलानीवीर क्विंटन डी कॉक यालाही या प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळालंय. तर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघातील केवळ दोन खेळाडूंना या प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळालंय. फिरकीपटू अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि फिरकीपटू अॅडम झाम्पा आहेत यांना स्थान मिळालंय. याशिवाय न्यूझीलंडच्या डॅरेल मिशेलला मधल्या फळीत स्थान मिळालंय. गोलंदाजीत श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाची प्लेईंग-11 मध्ये निवड झाली आहे. तर दुसरीकडं पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, नेदरलँड आणि बांगलादेशच्या एकाही खेळाडूला या सर्वोत्तम संघात स्थान देण्यात आलेलं नाही.