बंगळुरु World Cup 2023 AUS vs PAK :बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शुक्रवार झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या विश्वचषकातील 18 व्या सामन्यात अनेक विक्रम झाले आणि अनेक विक्रम मोडले गेले. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या ऑस्ट्रेलियन सलामीच्या जोडीनं पाकिस्तानविरुद्ध दमदार कामगिरी करत शानदार शतकं झळकावली. यामुळं ऑस्ट्रेलियानं 50 षटकांत 9 गडी गमावून 367 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात 367 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 305 धावांवर गारद झाला. परिणामी ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव केला.
विश्वचषकात धावांची सर्वोच्च सलामी : ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच विरोधी संघाच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. यामुळं वॉर्नर आणि मार्शनं यंदाच्या विश्वचषकात धावांची सर्वोच्च सलामी भागीदारी केली आहे. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 33.5 षटकांत 259 धावा जोडल्या. या सामन्यात मिचेल मार्शनं 121 धावांची तर डेव्हिड वॉर्नरनं 163 धावांची तुफानी खेळी केली. या दोघांनीही मजबूत मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर भरपूर धावा केल्या.
इतिहासातील दुसरी सर्वात मोठी भागीदारी : एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियासाठी ही सर्वात मोठी सलामीची भागीदारी ठरलीय. या भागीदारीत दोन्ही फलंदाजांनी शतकं झळकावली. यासह, हे दोन्ही फलंदाज एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील सलामीची दुसरी सर्वात मोठी भागीदारी करणारे खेळाडू बनले आहेत. याआधी 2011 च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशान आणि उपुल थरंगा यांनी झिम्बाब्वेविरुद्ध पल्लेकेलेमध्ये 282 धावांची भागीदारी केली होती. यासह आणखी अनेक विक्रम नोंदवले गेलेत.