कोलकाता Virat Kohli : रनमशीन विराट कोहलीनं पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो आधुनिक काळातील महान फलंदाजांपैकी एक आहे. आज त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरच्या आणखी एका विक्रमाची बरोबरी केली. विराटनं आज वनडेतील ४९ वं शतक ठोकलं. या शतकासह त्यानं सचिनच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. विशेष म्हणजे, कोहलीनं अवघ्या २७७ डावात हा कारनामा केला आहे. सचिनला ४९ वनडे शतक झळकवण्यासाठी ४५२ डाव लागले होते.
३५ व्या वाढदिवशी शतक साजरं केलं : खचाखच भरलेल्या ईडन गार्डन्समध्ये विराटनं रविवारी त्याच्या ३५ व्या वाढदिवशी आपलं ऐतिहासिक ४९ वं एकदिवसीय शतक झळकावलं. हे त्याचं या विश्वचषकातील दुसरं शतक आहे. तो १२१ चेंडूत १०१ धावा करून नाबाद राहिला. त्याच्या खेळीच्या बळावर भारतानं निर्धारित ५० षटकांत ३२६ धावांचा डोंगर रचला. कोहलीसाठी ईडन गार्डन्सवर शतक ठोकणं खास आहे, कारण २००९ मध्ये त्यानं याचं मैदानावर श्रीलंकेविरुद्ध आपलं पहिलं एकदिवसीय शतक झळकावलं होतं.