मुंबई Virat Kohli : विराट कोहलीनं आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमी ४९ वनडे शतकांची बरोबरी केली. विराटनं शतक झळकवताच सचिननं त्याचं कौतूक केलं. सचिननं विराटच्या शतकानंतर अवघ्या काही मिनिटांतच सोशल मीडियावर पोस्ट टाकत विराटचं अभिनंदन केलं.
'विराट तू खूप चांगला खेळला. मला (वयाच्या) ४९ वरून ५० वर जाण्यासाठी ३६५ दिवस लागले. मला आशा आहे की पुढच्या काही दिवसांत तू ४९ वरून ५० वर (शतकं) जाशील आणि माझा विक्रम मोडशील. अभिनंदन!!' - सचिन तेंडुलकर
३५ व्या वाढदिवशी विक्रम केला : विराट कोहलीनं ४९ शतकांचा हा महत्वपूर्ण टप्पा एका खास दिवशी गाठला. आज (५ नोव्हेंबर) विराट त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा करतोय. उल्लेखनीय म्हणजे, कोहली गेल्या दोन सामन्यांमध्ये हा टप्पा गाठण्याच्या मार्गावर होता, मात्र दोन्ही सामन्यांमध्ये तो काही धावांनी हुकला. विराटनं मागील सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ८८ (९४) आणि त्या आधीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ९५ (१०४) धावा केल्या होत्या.
विश्वचषकात डी कॉकनंतर सर्वाधिक धावा : सचिन तेंडुलकरनं २०१२ मध्ये मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध ४९वं एकदिवसीय शतक ठोकलं होतं. सचिननं ४५१ व्या डावात हा टप्पा गाठला. तर कोहलीला हा विक्रम गाठण्यासाठी केवळ २७७ डाव लागले. चालू विश्वचषकात कोहली तुफान फॉर्ममध्ये आहे. तो या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत क्विंटन डी कॉकनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. डी कॉकनं ८ सामन्यांमध्ये ६८.७५ च्या सरासरीनं ५५० धावा केल्या असून, कोहलीच्या नावे १०८.६ च्या सरासरीनं ५४३ धावा आहेत.
हेही वाचा :
- Virat Kohli : कोहलीचा 'विराट' पराक्रम, सचिनच्या ४९ शतकांची बरोबरी