मुंबई Cricket World Cup २०२३ : विश्वचषक 2023 चा 23 वा सामना आज आफ्रिका आणि बांग्लादेश यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ मैदानात चुरशीनं उतरतील त्यामुळे या सामन्याच्या विजयाकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष असेल. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी हा सामना जिंकणे दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड : बांग्लादेश गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत चारपैकी तीन सामने जिंकलेत आणि गुणतालिकेत तिसरे स्थान कायम राखलं आहे. आजचा बांग्लादेशविरुद्धचा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला तर दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या क्रमांकावर येण्याची पूर्ण आशा आहे. या दोन देशांदरम्यान आतापर्यंत २४ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत ज्यात दक्षिण आफ्रिकेनं १७ सामने जिंकले आहेत. दोघांमधील विश्वचषक सामन्यांबद्दल बोलायचं झाल्यास, ४ सामने झाले आहेत ज्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी समान म्हणजेच दोन सामने जिंकले आहेत.