मुंबई Sachin Tendulkars Life Size Statue : मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) 1 नोव्हेंबरला सचिनचं होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. आपल्या नावावर अनेक विक्रम असलेल्या सचिनसाठी त्याच्या कारकिर्दीतलं वानखेडे स्टेडियम एक महत्वाचं मैदान आहे. क्रिकेट विश्वचषकातील भारत-श्रीलंका सामन्याच्या पूर्वसंध्येला 200 कसोटी सामने खेळणाऱ्या 50 वर्षीय तेंडुलकरच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 15,821 कसोटी धावा आणि तब्बल 18,426 एकदिवसीय धावा करणारा 'भारतरत्न' सचिन तेंडुलकर या सोहळ्यासाठी स्वतः उपस्थित राहणार आहे.
अनेक राजकीय नेते, माजी खेळाडू राहणार उपस्थित : या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे असतील तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. तसंच या सोहळ्याला अनेक माजी क्रिकेटपटू उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गज दिवंगत शेन वॉर्नच्या चेंडूवर सरळ षटकार मारणारा सचिन तेंडुलकरचा 22 फुटांचा पुतळा प्रसिद्ध चित्रकार-शिल्पकार प्रमोद काळे यांनी बनवला असून बुधवारी तो लोकांसाठी खुला करण्यात येणार आहे. एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी याबाबतची कल्पना मांडली होती.