अहमदाबाद Sachin Tendulkar Gift To Virat Kohli : विराट कोहलीनं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात वनडे क्रिकेटमधलं आपलं ५० वं शतक झळकावलं. यासह त्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रम मोडीत काढला.
सचिनकडून विराटला खास भेट : विराट कोहली सचिनला आपला आदर्श मानतो. हा विक्रम मोडल्यानंतर खुद्द सचिन तेंडुलकरनं सोशल मीडियावर पोस्ट करून विराटचं कौतुक केलं होतं. आता रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक फायनलपूर्वी कोहलीला सचिनकडून एक बहुमोल गिफ्ट मिळालं. सचिननं विराटला त्याची प्रतिष्ठित क्रमांक १० ची जर्सी भेट दिली. ही जर्सी सचिननं २०१२ मध्ये मीरपूर येथे पाकिस्तानविरुद्ध आपल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात घातली होती. विशेष म्हणजे, या जर्सीवर सचिनची स्वाक्षरी देखील आहे.
या विश्वचषकात दमदार कामगिरी : कोहली एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ५० शतकं ठोकणारा पहिला फलंदाज आहे. विराट कोहलीनं या विश्वचषकात देखील धडाकेबाज कामगिरी केली. त्यानं खेळलेल्या ११ सामन्यांच्या ११ डावात ९५.६२ च्या सरासरीनं ७६५ धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्यानं बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातं शतकं झळकावली. या आधी एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे होता. सचिननं २००३ च्या विश्वचषकात ६७३ धावा केल्या होत्या.
अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावलं : ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही कोहलीनं आपल्या बॅटची जादू दाखवली. सलामीवीर शुभमन गिल झटपट बाद झाल्यानंतर कोहली मैदानावर आला. त्यानंतर त्यानं ६३ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीनं ५४ धावा केल्या. हे त्याच्या वनडे कारकीर्दीतील ७२ वं अर्धशतक आहे.
हेही वाचा :
- Virat Kohli : विराट कोहलीची शतकांची 'हाफ सेंच्यूरी', सचिनचा रेकॉर्ड मोडला
- Sachin Tendulkar : 'मी पाहिलेला तरुण मुलगा आता 'विराट' खेळाडू बनला', कोहलीच्या विक्रमानंतर क्रिकेटच्या 'देवा'ची प्रतिक्रिया
- नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये घुसला पॅलेस्टाईन समर्थक, विराटला भेटायला गेला थेट खेळपट्टीवर