अहमदाबाद Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना १९ नोव्हेंबर (रविवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वविजेता बनण्याचा प्रयत्न करणार असून, ऑस्ट्रेलियाचा सहाव्यांदा जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न असेल. या सामन्याच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यानं पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना रोहितनं विकेटचं मूल्यांकन करून प्लेइंग ११ बाबत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. याशिवाय रोहितनं मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचंही कौतुक केलं.
मोहम्मद शमीचं कौतुक केलं : या विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचं रोहितनं तोंडभरून कौतुक केलं. "मोहम्मद शमी सुरुवातीला खेळू शकला नाही. तो त्याच्यासाठी खूप कठीण क्षण होता. मात्र तो सिराज आणि इतर गोलंदाजांना साथ देत होता. त्याला संघात का घेतलं नाही, याबद्दल आम्ही त्याच्याशी बोललो. तो त्याच्या गोलंदाजीवर खूप मेहनत घेत होता. यावरून तो स्पर्धेपूर्वी कोणत्या मानसिक अवस्थेत होता हे दिसून येतं", असं शमी म्हणाला.
अंतिम सामन्यातअश्विनला संधी मिळेल का : अंतिम सामन्यात प्लेइंग ११ मध्ये अश्विनला संधी मिळेल का? या प्रश्नावर रोहितनं स्पष्ट उत्तर दिलं नाही. "हा माझ्यासाठी मोठा क्षण आहे. मी ५० षटकांचा विश्वचषक पाहत मोठा झालोय. आम्ही प्लेइंग ११ बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. १५ पैकी कोणीही खेळू शकतो. आम्ही विकेटचं मूल्यांकन करू आणि निर्णय घेऊ. विकेट बघून मग निर्णय घ्यावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाची बलस्थानं आणि कमकुवतता लक्षात घेऊन निर्णय घेईल हे नक्की", असं त्यानं स्पष्ट केलं.