अहमदाबाद Pitch Invader Ind Vs Aus :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना सुरू आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान एक विचित्र घटना घडली.
पॅलेस्टाईन समर्थक खेळपट्टीवर पोहचला : टॉस हारल्यानंतर भारत प्रथम फलंदाजी करतो आहे. दरम्यान, खेळाच्या १४ व्या षटकात एक पॅलेस्टाईन समर्थक सुरक्षा रक्षकांचा वेढा ओलांडून खेळपट्टीवर पोहचला. या व्यक्तीनं 'पॅलेस्टाईनवर बॉम्बफेक थांबवा' असा संदेश लिहिलेला टी-शर्ट घातला होता. याशिवाय त्यानं चेहऱ्यावर पॅलेस्टाईनच्या झेंड्याच्या मास्कही लावला होता.
विराट कोहलीच्या दिशेनं गेला : हा व्यक्ती सरळ धावत खेळपट्टीवर फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीच्या दिशेनं गेला. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं आणि मैदानाबाहेर नेलं. यामुळे सामन्यात थोडा वेळ व्यत्यय आला होता. या व्यक्तीला बाहेर नेल्यानंतर सामना पुन्हा सुरळीत सुरू झाला. विशेष म्हणजे, १,३०,००० लोकांच्या क्षमतेचं हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम फायनल मॅचसाठी खचाखच भरलेलं आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलं : भारत-ऑस्ट्रेलिया फायनल मॅचदरम्यान सुरक्षेचा भंग करून मैदानात घुसणाऱ्या माणसाला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेऊन अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात आणलं. जॉन असं त्या व्यक्तीचं नाव असून तो ऑस्ट्रेलियन आहे. "मी विराट कोहलीला भेटण्यासाठी मैदानात प्रवेश केला. मी पॅलेस्टाईनला पाठिंबा देतो", असं त्यानं सांगितलं.
इस्रायल-हमास संघर्ष : गेल्या महिन्यात ७ तारखेला हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर हल्ला केला होता. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देत इस्रायलनं गाझावर जोरदार बॉम्बवर्षाव सुरू केला. गेल्या एका महिन्यापासून हा संघर्ष जारी आहे. यामध्ये आतापर्यंत जवळपास १२,००० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झालाय. यामध्ये शेकडो छोट्या मुलांचाही समावेश आहे. जगभरातील मुस्लीम देशांनी इस्रायलच्या या कारवाईचा निषेध करत युद्धबंदीचं आवाहन केलं आहे. याशिवाय, संयुक्त राष्ट्र संघानंही या संघर्षावर चिंता व्यक्त केलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दुसऱ्या 'व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ समिट'ला संबोधित करताना हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्षात होत असलेल्या नागरिकांच्या हत्येचा निषेध केला होता.
हेही वाचा :
- बरं झालं भारत टॉस हारला, नाणेफेकीवरून वसीम अक्रमची मजेशीर प्रतिक्रिया