मुंबई Pravin Amre :२०१९ च्या विश्वचषकात टीम इंडियासमोर सर्वात मोठा प्रश्न होता तो चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा. भारत विश्वचषकात त्या स्थानावरील कोणत्याही तज्ञ फलंदाजाशिवाय उतरला होता. उपांत्य फेरीपर्यंत सर्व काही सुरळीत चाललं होतं. मात्र तेव्हा टीम इंडियासमोर अडथळा आला तो ट्रेंट बोल्टचा! सेमी फायनलमध्ये भारताचा टॉप ऑर्डर या किवी गोलंदाजापुढे सपशेल कोसळला आणि सोबतच भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्नही भंगलं.
श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावरील स्पेशलिस्ट फलंदाज : आता चार वर्षांनंतर मात्र परिस्थिती वेगळी आहे. या विश्वचषकात भारत चौथ्या क्रमांकावरील स्पेशलिस्ट फलंदाजासह उतरला आहे आणि त्यानं आपल्या प्रदर्शनानं सर्वांचीच मनं जिंकली आहेत. या फलंदाजाचं नाव आहे श्रेयस अय्यर. मुंबईकर श्रेयस अय्यरची आतापर्यंतची कारकीर्द रोलर कोस्टर राईड राहिली. २०१५ मध्ये त्यानं वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं. २०१७ मध्ये त्यानं भारतासाठी पहिला टी २० आणि वनडे सामना खेळला. मात्र त्यानंतर तो त्याच्या कामगिरीत सातत्य राखू शकला नाही. मात्र गेल्या दोन वर्षांत तो खऱ्या अर्थानं टीम इंडियामध्ये सेटल झाला असं म्हणता येईल. आता या विश्वचषकात महत्वाच्या अशा चौथ्या क्रमांकावर त्यानं चांगली कामगिरी करत टीम मॅनेजमेंटनं दिलेली भूमिका उत्तमपणे निभावली आहे.
श्रेयसचं स्वप्न पूर्ण झालं : याचं श्रेयस अय्यरचे कोच प्रवीण आमरे यांनी त्याच्या विश्वचषकातील कामगिरीबाबत 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत केली. श्रेयस अय्यरनं रविवारी नेदरलॅंडविरुद्धच्या सामन्यात विश्वचषकातील त्याचं पहिलं शतक झळकावलं. प्रवीण आमरे यांनी श्रेयसचं एक स्वप्न पूर्ण झाल्याचं सांगितलं. "कुठल्याही खेळाडूचं वर्ल्ड कपमध्ये शतक करण्याचं स्वप्न असतं. श्रेयसचंही ते स्वप्न होतं, जे आता पूर्ण झालं आहे", असं ते म्हणाले.