हैदराबाद Prasidh Krishna : टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मिळणं ही कुठल्याही खेळाडूसाठी सन्मानाची गोष्ट असते. विशेषत: विश्वचषक संघात खेळणं आणि देशाचं प्रतिनिधित्व करणं ही अत्यंत अभिमानाची बाब. विश्वचषकाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर त्याच्या जागी कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाची भारतीय संघात निवड करण्यात आली.
प्रसिद्ध सुरुवातीपासूनच प्रतिभावान गोलंदाज : बेंगळुरूच्या बसवानगुडी क्रिकेट अकादमी आणि माउंट जॉय क्रिकेट क्लबमध्ये खेळून मोठा झालेला प्रसिद्ध कृष्णा आता देशाचं प्रतिनिधित्व करत आहे. माऊंट जॉय क्रिकेट क्लबचे सचिव बीके रवी यांनी प्रसिद्धचा भारतीय संघात समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रसिद्धनं सुरुवातीच्या काळात बसवानगुडी क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतलं. नंतर तो माउंट जॉय क्रिकेट क्लबकडून खेळला. तो सुरुवातीपासूनच प्रतिभावान गोलंदाज राहिला आहे. विश्वचषक संघात संधी मिळाल्यानं तो खूश होता.
विश्वचषक संघात शिकण्याच्या संधी मिळतात : बीके रवी यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत करताना सांगितलं की, 'त्याला संघात स्थान मिळेल यावर पूर्ण विश्वास होता. विश्वचषक संघात असताना शिकण्याच्या अधिक संधी मिळतात, असं ते म्हणाले. विश्वचषकात आतापर्यंत अपराजित राहिलेल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचंही बीके रवी यांनी कौतुक केलं. 'टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. गेल्या दहा वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ आम्ही संपवू असं वाटतं. आमच्या क्लबचा एक मुलगा इतक्या मोठ्या संघात खेळला हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे', असं ते म्हणाले.