हैदराबाद PCB Complaint To ICC :पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) औपचारिक निषेध नोंदवला. भारतात सुरू असलेला क्रिकेट विश्वचषक कव्हर करण्यासाठी पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसा देण्यात विलंब झाला असल्याची तक्रार पीसीबीनं केली आहे. १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या भारताविरुद्धच्या लढतीसाठी फक्त एक ते दोन पाकिस्तानी पत्रकार उपस्थित होते.
चाहत्यांना व्हिसा नाकारण्याचा निषेध : यासह पीसीबीनं पाकिस्तानी चाहत्यांना व्हिसा नाकारण्याचा धोरणाचाही निषेध केला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात १,३२,००० लोकं बसण्याची क्षमता असलेल्या स्टेडियममध्ये एकही पाकिस्तानी चाहता उपस्थित नव्हता. पीसीबीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसासाठी होणारा विलंब आणि चाहत्यांना नाकारण्यात आलेला व्हिसा, यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आयसीसीकडे औपचारिक निषेध नोंदवला. तसेच भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान पाकिस्तान संघासोबत झालेल्या अनुचित वर्तनाबद्दलही पीसीबीनं आयसीसीकडे तक्रार केली आहे.
पाकिस्तानी खेळाडूंची टिंगल उडवली : वृत्तानुसार, भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित काही चाहत्यांनी पाकिस्तानी खेळाडूंची टिंगल उडवली होती. रोहित शर्माच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर भारतानं या सामन्यात ७ गडी राखून सहज विजय मिळवला होता. 'पीसीबीनं १४ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तान संघासोबत झालेल्या अनुचित वर्तनाबद्दल तक्रार दाखल केली आहे', असं पीसीबीनं मीडियाद्वारे सांगितलं. विशेष म्हणजे, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पाहण्यासाठी पीसीबी अध्यक्ष झका अशरफही उपस्थित होते.
पाकिस्तानसमोरऑस्ट्रेलियाचं आव्हान : पाकिस्तान संघानं हैदराबादमधून आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर ते अहमदाबादला गेले. आता ते सध्या बेंगळुरूमध्ये आहेत. पाकिस्ताननं विश्वचषकात आतापर्यंत दोन सामने जिंकले असून, एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. शुक्रवार, २० ऑक्टोबर रोजी बेंगळुरू येथे त्यांच्यासमोर पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचं आव्हान असेल.
हेही वाचा :
- Cricket World Cup २०२३ : पाकिस्तानवरील विजयानंतर कोल्हापुरात चाहत्यांचा जल्लोष, पाहा व्हिडिओ
- Ind Vs Pak : घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाची विजयादशमी, नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानला लोळवलं