महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पॅट कमिन्स जे बोलला ते करून दाखवलं, एकाच चेंडूत संपूर्ण स्टेडियम शांत! - क्रिकेट विश्वचषक

Pat Cummins : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं लयीत असलेल्या विराट कोहलीची विकेट घेतली. कोहली बाद होताच संपूर्ण स्टेडियम शांत झालं.

Pat Cummins
Pat Cummins

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 5:26 PM IST

अहमदाबाद Pat Cummins :अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जातोय. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं टॉस जिंकून भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली आहे. २०० धावांच्या आत भारताचे आघाडीचे ५ फलंदाज तंबूत परतले.

कमिन्सनं कोहलीला बोल्ड केलं : या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं विराट कोहलीला आपल्या गोलंदाजीत बोल्ड केलं. कोहली ६३ चेंडूत ५४ धावा करून बाद झाला. आऊट होण्यापूर्वी विराट शानदार लयीत दिसत होता. मात्र कमिन्सनं त्याची विकेट घेऊन भारताला मोठा धक्का दिला. कोहली बाद होताच संपूर्ण स्टेडियमवर एकच शांतता पसरली. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी आली होती. विराट बाद होताच तिलाही मोठा धक्का बसला.

विराटनं निराशेत खेळपट्टी सोडली : कठीण काळात फलंदाजीला आलेल्या कोहलीकडून सर्वांना आज आणखी एका शतकाची अपेक्षा होती. मात्र पॅट कमिन्सनं त्याची विकेट घेऊन सर्वांचा अपेक्षाभंग केला. स्वत: कोहलीदेखील आऊट झाल्यानंतर अत्यंत निराश दिसत होता. त्यानं निराशेतच खेळपट्टी सोडली आणि पॅव्हेलियनमध्ये जाऊन बसला. शनिवारी (१८ नोव्हेंबर) सामन्याच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत पॅट कमिन्सनं एक मोठं वक्तव्य केलं होतं. विराटच्या विकेटनंतर पॅट कमिन्सनं आपलं हे वक्तव्य खरं करून दाखवलं.

काय म्हणाला होता कमिन्स :पत्रकार परिषदेत कमिन्सला प्रश्न विचारण्यात आला होता की, स्टेडियमध्ये जेव्हा १,३०,००० प्रेक्षक भारतासाठी चियर करतील तेव्हा त्यांना उत्तर देणं तुम्हाला जड जाईल का? याला उत्तर देताना कमिन्स म्हणाला की, "मला वाटतं आम्हाला हे स्वीकारावं लागेल. साहजिकच मॅचमध्ये भारताला एकतर्फी पाठिंबा असेल. मात्र जेव्हा मोठा जनसमुदाय गप्प होतो, ते ऐकण्यापेक्षा समाधानकारक काहीही नाही. हेच करणं आमचं उद्याचं ध्येय आहे", असं तो म्हणाला होता.

विराटची कामगिरी : विराट या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्यानं ११ सामन्याचा ११ इनिंग्जमध्ये ९५.६२ च्या सरासरीनं तब्बल ७६५ धावा ठोकल्या. एका विश्वचषकात कोणत्याही फलंदाजाच्या या सर्वाधिक धावा आहेत.

हेही वाचा :

  1. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये घुसला पॅलेस्टाईन समर्थक, विराटला भेटायला गेला थेट खेळपट्टीवर
  2. रोहितचा झेल घेण्यासाठी ट्रॅव्हिस हेडची 'हनुमान उडी', मैदानावर स्मशान शांतता
  3. बरं झालं भारत टॉस हारला, नाणेफेकीवरून वसीम अक्रमची मजेशीर प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details