अमरोहा (उत्तर प्रदेश) Mohammed Shami :मोहम्मद शमीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या ओठावर त्याचं नाव आहे. मात्र त्याच्या यशामागील कथा फार कमी लोकांना माहीत असेल.
विश्वचषकात अशी संधी मिळाली : शमीनं या विश्वचषकात खेळण्याची संधी मिळताच खळबळ उडवून दिली. त्यानं तीन सामन्यांमध्ये १४ विकेट आपल्या नावे केल्या आहेत. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, शमी या विश्वचषकात प्लेइंग ११ साठी पहिला चॉइस नव्हता. हार्दिक पंड्याला दुखापत झाल्यानं शमीला टीममध्ये संधी मिळाली आणि त्यानं संधीचं सोनं केलं. त्याच्या या विक्रमी यशानंतर 'ईटीव्ही भारत'ची टीम उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातल्या सहसपूर अलीनगर या शमीच्या गावात पोहोचली. येथे शमीच्या आयुष्यातील अनेक अस्पर्शित पैलूंचा उलगडा झाला.
वडिलांचं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न होतं : मोहम्मद शमीचं पूर्ण नाव मोहम्मद शमी अहमद लालजी आहे. त्याचा जन्म ३ सप्टेंबर १९९० रोजी झाला. मोहम्मद शमीच्या वडिलांचं नाव तौसिफ अहमद अली, तर आईचं नाव अंजुम आरा आहे. त्याला मोहम्मद कैफ नावाचा भाऊ असून, आयरा शमी नावाची मुलगी आहे. त्याची पत्नी हसीन जहाँ मॉडेल आहे. शमीचे वडील तौफिक अहमद अली हे देखील क्रिकेटचे शौकीन होते. ते वेगवान गोलंदाजी करायचे. मात्र घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्याचं क्रिकेट खेळण्याचं स्वप्न काही पूर्ण होऊ शकलं नाही. त्यांनी शेती करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. पण, जेव्हा शमीचा जन्म झाला, तेव्हा त्यांनी त्याला क्रिकेट खेळाडू बनवण्याचा निर्णय घेतला. शमी १५ वर्षांचा असताना तौफिक अहमद अली यांनी त्याला पहिल्यांदा चेंडू दिला.
गावातील स्टेडियममधून क्रिकेट खेळायला सुरुवात : शमीचे काका अरमान अहमद आजही त्याच्या मूळ गावी राहतात. त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं की, शमीनं याचं गावातील स्टेडियममधून प्रथम क्रिकेट खेळायला सुरुवात केली. बदरुद्दीन सिद्दीकी हे मोहम्मद शमीचे प्रशिक्षक आहेत. त्यांनीचं शमीला क्रिकेटच्या दुनियेत आणलं. शमी हा उजव्या हातानं गोलंदाजी करतो. याशिवाय तो गरज भासल्यास फलंदाजीही करू शकतो. त्यानं बॅटनही अनेकदा चमकदार कामगिरी केली आहे.