मुंबई : भारतात सुरू असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं आतापर्यंत सर्वच साखळी सामने जिंकत उपांत्य फेरीत धडाक्यात प्रवेश केला. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ उपांत्य फेरीसह अंतिम फेरीही जिंकेल, असा विश्वास भारताचे माजी गोलंदाज करसन घावरी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
घरच्या परिस्थितीचा फायदा मिळेल : १९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकात आपल्या भेदक गोलंदाजीनं प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरवणारे करसन घावरी म्हणाले की, "ज्या प्रकारे भारतानं विश्वचषकात सलग ९ साखळी सामने जिंकलेत, त्यामुळे टीमचं मनोबल वाढलं आहे. त्यासोबत हा विश्वचषक भारतात होत असल्यामुळे, घरच्या परिस्थितीचा फायदाही भारतीय संघाला मिळेल", असं त्यांनी सांगितलं.
भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना होणार : पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत असून, दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. "भारत न्यूझीलंडला पराभूत करेल, तर ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवेल", असा अंदाज घावरी यांनी व्यक्त केला. "अशाप्रकारे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना होईल आणि त्यात भारतीय संघ विजयी ठरेल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.