अहमदाबाद Cricket World Cup 2023 Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशातील सर्वच क्षेत्रातील अनेक दिग्गज हजेरी लावणार आहेत. अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी, उद्योगपती अंबानी, अदानी, बॉलिवूड स्टार्ससह अनेक सेलिब्रिटीही मैदानावर उपस्थित राहणार आहेत. या महामुकाबल्यासाठी अहमदाबादसह नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज झालं आहे. या सामन्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
दिग्गज राजकीय नेत्यांची मांदियाळी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर होणार आहे. या मैदानावर तब्बल 1 लाख 32 हजार प्रेक्षक सामना पाहू शकतात. अंतिम सामन्यात भारताला पाठिंबा देण्यासाठी एक लाखाहून अधिक लोक मैदानावर पोहोचणार आहेत. प्रेक्षकांसह या सामन्याला पंतप्रधान मोदी यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान तथा संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्सदेखील मैदानावर येणार आहेत. यांच्या व्यतिरिक्त देशभरातील आठ राज्यांचे मुख्यमंत्री, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंबीय, अदानी समूहाचे मालक गौतम अदानी आणि इतर अनेक दिग्गज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
अनेक माजी खेळाडूही राहणार उपस्थित : क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना अविस्मरणीय बनवण्यासाठी आयसीसीनं एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात यापूर्वीच्या सर्व विश्वविजेत्या कर्णधारांना आमंत्रित केलंय. हा सामना पाहण्यासाठी आयसीसीनं 1975 ते 2019 या कालावधीतील विश्वविजेत्या संघांच्या कर्णधारांना आमंत्रित केलंय. या सर्व कर्णधारांना खास ब्लेझरही देण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचे विश्वविजेते कर्णधार महेंद्र सिंग धोनी, कपिल देव, ऑस्ट्रेलियाचे विश्वविजेते कर्णधार रिकी पॉंटिंग, अॅलेन बॉर्डर, मायकेल क्लार्क वेस्ट इंडिजचे विश्वविजेते कर्णधार क्लाइव्ह लॉईड, इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इयॉन मॉर्गन हे सर्व उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग रात्रीच अहमदाबादला दाखल झालाय.
अंतिम सामन्याला हजेरी लावणारे दिग्गज :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा
- ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान तथा संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स
- गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल
- माजी क्रिकेटपटू कपिल देव
- भारतरत्न सचिन तेंडुलकर
- एम एस धोनी
- बीसीसीआयचे सचिव जय शाह
- माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी
- राजीव शुक्ला
- अभिनेते रजनीकांत
- बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन
- रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास
- अदानी समूहाचे मालक गौतम अदानी
- अभिनेता शाहरुख खान, आमिर खान आणि रणवीर सिंह
हेही वाचा :
- भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात दोन्ही संघातील 'या' खेळाडूंमध्ये रंगणार 'द्वंद्व युद्ध'
- 140 कोटी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता भारतीय संघाचे 11 शिलेदार उतरणार मैदानात; कोण होणार विश्वविजेता?
- India vs Australia cricket Live updates: आज आपण विश्वचषक उचलू, अशी आशा आहे- सचिन तेंडुलकर