अहमदाबाद Ind Vs Pak :अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ७ गडी राखून दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारतानं पाकिस्तानला विजयाची कुठलीही संधी दिली नाही.
बाबर आझमचं अर्धशतक : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान ४२.५ षटकात सर्वबाद केवळ १९१ धावाचं करू शकला. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफिकनं अनुक्रमे ३६ आणि २० धावांचं योगदान दिलं. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार बाबर आझमनं सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. त्यानं ५८ चेंडूत शानदार ५० धावा ठोकल्या. मात्र तो बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा डाव गडगडला.
भारताची गोलंदाजी : त्यानंतर मोहम्मद रिझवाननं एका टोकावरून किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला ४९ धावांवर बुमराहनं बोल्ड केलं. त्यानंतर पाकिस्तानचा एकही फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. या सामन्यात भारताच्या सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. बुमराहनं ७ षटकांत १९ धावा देत २ बळी घेतले. याशिवाय सिराज, हार्दिक, कुलदीप आणि जडेजानं २-२ विकेट घेतल्या.