मुंबई Cricket World Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघ इतिहास रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक 2023 चा अंतिम सामना आज (19 नोव्हेंबर) गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दरम्यान, ज्या क्षणाची वाट जवळपास दीड महिना पाहिली गेली, तो क्षण आता अवघ्या काही तासांवर आला आहे. त्यामुळं सर्वत्र उत्साहाच वातावरण पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर आता गुगलनं क्रिकेट विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यासाठी एक खास डूडल तयार केलं आहे.
कसं आहे डूडल :भारत-ऑस्ट्रेलियामध्ये आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा थरार रंगणार आहे. भारतात क्रिकेटला उत्सवाप्रमाणं साजरं केलं जातं. प्रत्येक क्रिकेटप्रेमी आपल्या स्टाईलमध्ये मेन इन ब्ल्यूला सपोर्ट करतोय. टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये असून याच पार्श्वभूमीवर विविध स्तरातून त्यांना आजच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. यासाठी गुगलनेही खास डूडल तयार केलंय. हे डूडल ॲनिमेटेड स्वरूपात आहे. प्रेक्षकांच्या उपस्थितीत क्रिकेटचे ग्राऊंड अन् ट्रॉफी या डूडलमध्ये दिसत आहे. तसंच तुम्ही या ॲनिमेटेड चित्रावर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला आजच्या सामन्याची सविस्तर माहिती दिसेल.