हैदराबाद Yajurvindra Singh :क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियानं अपराजित राहून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता रविवारी (१८ नोव्हेंबर) अंतिम फेरीत भारताचा सामना पाच वेळचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाची होणार आहे. या विश्वचषकातील एकूणच कामगिरी बघता, भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जातोय. संघाच्या कामगिरीचंही सर्वत्र कौतुक होत आहे. "आताच्यासारखा भारतीय संघ याआधी कधीही बघितला नाही", अशी प्रतिक्रिया माजी कसोटीपटू यजुर्वेंद्र सिंग यांनी व्यक्ती केली.
रोहितच्या खेळाचं समर्थन केलं : या विश्वचषकात कर्णधार रोहित शर्मा अत्यंत आक्रमकपणे खेळला. यावर बोलताना यजुर्वेंद्र सिंग म्हणाले की, "रोहितनं आक्रमकपणे खेळावं हा निर्णय ज्यानं कोणी घेतला असेल तो अतिशय चांगला निर्णय आहे. अशा प्रकारचा खेळ १९९६ मध्ये श्रीलंकेनं केला होता. ही अतिशय चांगली रणनीती आहे. ऑस्ट्रेलियाही अंतिम सामन्यात अशाच प्रकारे खेळू शकते. त्यामुळे जर रोहित शर्माची फलंदाजी चांगली झाली तर सामना तिथेच भारताच्या बाजूनं झुकेल", असं म्हणत त्यांनी रोहितच्या या भूमिकेचं समर्थन केलं.
विराटची कामगिरी अविश्वसनीय : स्टार फलंदाज विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना दमदार खेळ करत भारताला सामना जिंकवून दिला. त्यानंतर त्याच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ झाली आणि त्यानं तिथून मागं वळून बघितलं नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० शतकं म्हणजे खूप मोठा विक्रम आहे. ही अविश्वसनीय कामगिरी आहे. त्यातही महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणं म्हणजे अशक्यच. मात्र ते विराट कोहलीन सहजरित्या केलंय, असं म्हणत त्यांनी विराटच्या कामगिरीचं कौतुक केलं.
...तर सहाव्या गोलंदाजाची कमतरता जाणवेल : भारतीय संघाच्या विजयात फलंदाजांबरोबरच गोलंदाजांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. संघात सहावा गोलंदाज असावा की नाही यावर बोलताना ते म्हणाले की, "सध्याची कामगिरी बघता भारतीय संघाला सहाव्या गोलंदाजाची गरज नाही. मात्र पाच गोलंदाजांपैकी एखादा गोलंदाज जखमी झाला तर मात्र भारतीय संघाच्या अडचणीत वाढ होऊ शकते. आतापर्यंतच्या सामन्यात तशी वेळ आली नाही आणि अंतिम सामन्यातही तशी वेळ येणार नाही अशी आपण प्रार्थना करू. मात्र दुर्दैवानं जर तशी वेळ आली तर निश्चितच भारतीय संघाला सहाव्या गोलंदाजाची कमतरता जाणवेल. त्याचा थेट परिणाम सामन्याच्या निकालावरही होऊ शकतो", असं मत त्यांनी व्यक्त केलं. "कोहली आणि रोहित हे काही प्रमाणात गोलंदाजी करू शकतात. मात्र अंतिम सामन्यासारख्या महत्त्वाच्या सामन्यात तसं करून चालणार नाही", असं ते म्हणाले.
गोलंदाज एकमेकांना सहकार्य करून गोलंदाजी करतात : भारतीय गोलंदाजीचा हिरो असलेल्या मोहम्मद शमीबद्दल बोलताना ते म्हणाले की, "शमी उत्कृष्ट स्विंग बॉलिंग करतो. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे गोलंदाजही अप्रतिम कामगिरी करत आहेत. ते एकमेकांना सहकार्य करून गोलंदाजी करत आहेत. भारतीय संघाच्या विजयात सर्व ११ खेळाडू आपापली भूमिका उत्तमरित्या पार पाडत आहेत. यापूर्वी असा संघ कधीही बघितला नाही", अशा शब्दात त्यांनी भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं.
रोहित मैदानावर जास्त टेन्शन घेत नाही : रोहित शर्माच्या कर्णधार म्हणून कामगिरीवर बोलताना ते म्हणाले की, "रोहितच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उठवण्याचा प्रश्नच येत नाही. त्याची फलंदाजी अप्रतिम आहे. तसेच कर्णधार म्हणूनही त्यानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सर्वांना एकसंघ ठेवून त्यानं भारतीय संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेलं. तो एकदम रिलॅक्स राहून आणि मैदानावरील परिस्थिती बघून आपले निर्णय घेतो. गोलंदाजीमध्ये बदल असतील किंवा क्षेत्ररक्षण असेल, या सर्वांमध्ये तो पटाईत आहे. त्यामुळे तो मैदानावर जास्त टेन्शन घेत नाही, रिलॅक्स राहून निर्णय घेतो आणि त्यात त्याला यशही मिळतं", असं ते म्हणाले.
इंग्लंड विश्वचषकाच्या तयारीमध्ये कमी पडला : गतविजेता इंग्लंड साखळी सामन्यातच बाद झाला. त्यांच्या कामगिरीबाबत बोलताना यजुर्वेंद्र सिंग म्हणाले की, इंग्लंडच्या कामगिरीमुळे आम्ही सर्वच हैराण आहोत. इंग्लंड संघाकडून अशी कामगिरी अपेक्षित नव्हती. विश्वचषकाच्या तयारीमध्ये ते कुठेतरी कमी पडले, असं त्यांनी सांगितलं. इंग्लंडचे बहुतांश खेळाडू हे भारतात आयपीएल खेळतात. तसेच यातील बहुतांश खेळाडू गतवेळच्या विश्वचषक विजेत्या संघात होते. मात्र असं असतानाही ऐनवेळी त्यांची तयारी कमी पडल्यानं त्यांच्यावर ही वेळ आल्याचं त्यांनी सांगितलं.
अफगाणिस्तानकडे उपांत्य फेरी गाठण्याची संधी होती : अफगाणिस्तान आणि नेदरलँड या दोन्ही संघांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. अफगाणिस्तान संघानं चार सामने जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अफगाणिस्तान संघाचं गोलंदाजी युनिट फार मजबूत आहे. त्यांच्याकडे मिस्ट्री स्पिनर आहेत. आजकालचे फलंदाज स्पिनर्सच्या हातावरून तो कोणत्या प्रकारचा चेंडू टाकतो हे ओळखत नाहीत. ते चेंडूचा टप्पा पडल्यावर ओळखतात. मात्र तोपर्यंत फार उशीर झालेला असतो", असं म्हणत त्यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचं कौतुक केलं. तसंच येणाऱ्या काळात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा संघ एक मजबूत संघ म्हणून उदयास येईल, असंही त्यांनी म्हटलं. "अफगाणिस्तानकडे उपांत्य फेरी गाठण्याची संधी होती, मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यांचा अनुभव कमी पडला आणि दुर्दैवाने त्यांना पराभव पत्करावा लागला", असं ते म्हणाले.
हेही वाचा :
- “शमीनं फायनलमध्ये चांगली कामगिरी करावी”, बदरूद्दीन सिद्दीकी यांची ‘ईटीव्ही भारत’शी बातचीत
- Mohammed Azharuddin : 'भारतच विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार', माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांची 'ईटीव्ही भारत'शी खास मुलाखत
- Dinesh Lad : 'रोहितला १३० कोटी जनतेचा आशीर्वाद, भारत वर्ल्डकप जिंकणारच'; रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांच्याशी खास बातचित