मुंबई Fielding Medal :या क्रिकेट विश्वचषकात भारतानं आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. भारत ७ पैकी ७ विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी असून, भारताचं उपांत्य फेरीतील स्थानही निश्चित झालंय. मात्र संघाच्या या मैदानावरील कामगिरीपेक्षा, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांच्या ड्रेसिंग रुममधील एका सोहळ्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
मॅचमधील सर्वोत्कृष्ट फिल्डरचा मेडल देऊन सन्मान : टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी या विश्वचषकात एका अभिनव उपक्रमाला सुरुवात केली. भारताच्या प्रत्येक सामन्यानंतर ते मॅचमधील सर्वोत्कृष्ट फिल्डरचा मेडल देऊन सन्मान करतात. त्यांच्या या उपक्रमाला खेळाडूंकडूनही उस्फूर्त प्रतिसाद मिळतोय. गुरुवारी गोलंदाजी युनिटच्या क्लिनिकल परफॉरमन्सच्या बळावर मेन इन ब्लूनं श्रीलंकेचा तब्बल ३०२ धावांनी पराभव केला. यानंतर, संघानं पदक समारंभ आयोजित केला. यामध्ये फलंदाज श्रेयस अय्यरला सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचं पदक देण्यात आलं. हा क्षण तेव्हा खास बनला, जेव्हा खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं रोहित शर्मा आणि कंपनीचं कौतुक केलं.
२००३ विश्वचषकाची आठवण सांगितली : बीसीसीआयनं 'X' वर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर टीम इंडियाच्या मैदानावरील समर्पणाचं कौतुक करताना दिसतोय. यावेळी बोलताना त्यानं २००३ विश्वचषकाचीही आठवण सांगितली. सचिन म्हणाला, 'आम्ही जेव्हा दक्षिण आफ्रिकेत खेळत होतो, तेव्हा आमच्याकडे एक चार्ट होता. त्यावर 'मी करू शकतो, आम्ही करू शकतो' असं लिहिलं होतं. प्रत्येक खेळाडू मैदानावर जाण्यापूर्वी त्या चार्टवर स्वाक्षरी करायचा. याद्वारे देशासाठी आणि संघासाठी सर्वस्व देण्याची प्रेरणा मिळायची'.
सचिन तेंडुलकरनं केलं कौतुक :सचिन पुढे म्हणाला, 'सध्याचा संघ क्षेत्ररक्षण पदक देऊन तेच करतोय. यातून तुमच्या सहकाऱ्यासाठी, तुमच्या संघासाठी आणि देशासाठी काहीतरी करण्याची तुमची कटिबद्धता दिसते. तुम्ही आतापर्यंत खेळलेला क्रिकेटचा ब्रँड मला आवडला. हे पाहणं खूप आनंददायी आहे, असं त्यानं नमूद केलं.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा भारत पहिला संघ; जाणून घ्या भारतीय संघाचा आतापर्यंतचा प्रवास
- Nepal Cricket Team : नेपाळ क्रिकेट संघाची ऐतिहासिक कामगिरी, टी २० विश्वचषकासाठी पात्र