बेंगळुरू Cricket World Cup 2023 :न्यूझीलंडचा युवा डावखुरा फलंदाज रचिन रवींद्र भारतात सुरू असलेल्या विश्वचषकात चमकदार कामगिरी करत आहे. विशेष बाब म्हणजे, रचिनचं नाव त्याच्या वडिलांनी भारताचे माजी दिग्गज खेळाडू, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या नावावर ठेवलंय. विश्वचषकात रचिन जबरदस्त फार्मात असून त्यानं आतापर्यंत ३ शतकं ठोकली आहेत.
रचिन मूळचा कर्नाटकचा आहे : रचिनच्या मामाचं घर कर्नाटकात असून त्याचे आजी-आजोबा बेंगळुरूमध्ये राहतात. त्याचे आजोबा टीए बालकृष्ण यांना रचिन रवींद्रला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबर रोजी भारताविरुद्ध अंतिम सामन्यात खेळताना आणि चांगली कामगिरी करताना पाहायचं आहे. बालकृष्ण म्हणाले, 'टीम इंडियानं वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली आहे. संघानं आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले. मला न्यूझीलंड आणि भारताचा अंतिम सामना पाहायला आवडेल. रचिननं सामन्यात चांगलं खेळावं, मात्र टीम इंडियानं विश्वचषक जिंकावा', असं ते म्हणाले.
वडील होते पहिले शिक्षक : १९९७ मध्ये रचिनचे आई-वडील कामानिमित्त न्यूझीलंडला गेले आणि त्यांना तेथील नागरिकत्व मिळालं. रचिनचा जन्म १९९९ मध्ये तिथेच झाला. त्याचे वडील रवी कृष्णमूर्ती हे त्याचे पहिले शिक्षक होते. रवी कृष्णमूर्ती यांना क्लब क्रिकेट खेळण्याचा अनुभव होता. क्रिकेटवरील प्रेमापायीच रचिनच्या आई-वडिलांनी त्याचं नाव सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या नावावर ठेवलं.
राहुल द्रविडनं कौतुक केलं : या युवा खेळाडूनं ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून मोठ्या मंचावर आपली घोषणा केली. यानंतर राहुल द्रविडनं रचिन रवींद्रचं कौतुक केलं होतं. बालकृष्ण म्हणाले, 'न्यूझीलंडमध्ये रचिन आणि (केन) विल्यमसन देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकाच संघाकडून खेळतात. त्यामुळे केनला रवींद्रची खेळण्याची क्षमता चांगलीच ठाऊक आहे. मला आशा आहे की त्याला आणखी संधी मिळतील. भारताचे वरिष्ठ खेळाडू त्याच्या खेळाचं मनापासून कौतुक करतात हे ऐकून बरं वाटलं', असं ते म्हणाले.