हैदराबाद Surendra Nayak Exclusive Interview : माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेंद्र नायक यांनी सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक 2023 मधील भारताच्या मोहिमेवर आपलं मत व्यक्त करताना म्हटलंय की, रोहित शर्मा विरोधी गोलंदाजांसाठी धोका बनला आहे. रोहितनं फलंदाजीत सातत्यानं चांगली कामगिरी केलीय. जेव्हा विश्वचषक येतो तेव्हा तो चमकदार कामगिरी करतो. भारतीय कर्णधारानं 6 डावात 66.33 च्या सरासरीनं 398 धावा केल्या आहेत. ज्यात एका शतकाचाही समावेश आहे. त्यानं आपल्या उत्कृष्ट खेळीनं संघाला चांगली सुरुवात करून दिलीय. रोहितच्या उत्कृष्ट फॉर्मबद्दल आपलं मत मांडताना सुरेंद्र नायक यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं.
रोहित शर्मा देवानं दिलेली देणगी : सुरेंद्र नायक ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघासाठी देवानं दिलेली देणगी आहे. त्याच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहेत. हा फलंदाज अष्टपैलू आहे. आक्रमक खेळण्याच्या क्षमतेसोबत तो आवश्यकतेनुसार आपला खेळ बदलू शकतो आणि त्याचवेळी तो संयमानं खेळू शकतो. कोहलीही फलंदाजीत योगदान देत असून त्यामुळं भारताची ट्रॉफी जिंकण्याची शक्यता वाढली आहे.
इंग्लंडची कामगिरी निराशाजनक : स्पर्धेतील सर्व 6 सामने जिंकणारा भारत हा आतापर्यंत एकमेव अपराजित संघ ठरलाय. तर स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जेतेपदासाठी दावेदार मानल्या जाणाऱ्या गतविजेत्या इंग्लंडची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यावर नायक म्हणाले की, भारतीय परिस्थितीशी जुळवून घेण्यात अपयश आणि सर्व 50 षटके खेळण्याची मानसिकता नसल्यामुळं इंग्लंडच्या कामगिरीवर परिणाम झालाय. ते पुढं म्हणाले, 'भारताचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पण इंग्लंडनं स्पर्धेत उतरून निराशा केलीय. त्यांचे फलंदाज भारतीय परिस्थितीशी जुळवून घेण्यात अपयशी ठरले आणि पूर्ण 50 षटकं खेळण्याची मानसिकता त्यांच्यात नव्हती. इंग्लिश संघाची कामगिरी अगदीच अनपेक्षित होती. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेच्या दबावाखाली तेही विखुरले, असं मला वाटत असल्याचंही नायक म्हणाले.