अहमदाबाद Cricket World Cup Final 2023 : भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 6 गडी राखून पराभव पत्करावा लागलाय. या सामन्यात भारतीय संघाला 240 धावाच करता आल्या आहेत. हे आव्हान ऑस्ट्रेलियानं 43 षटकात 4 गडी गमावून 241 धावा करून पूर्ण केलं. या पराभवानं कोट्यवधी भारतीयांची निराशा झाली. त्यामुळं भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यापासून वंचित राहिला. या पराभवानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियासाठी X (पुर्वीच ट्विटर) वर पोस्ट करून संघाला प्रोत्साहन दिलंय.
पंतप्रधानांसह अनेक दिग्गज क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटींनी टीम इंडियाच्या खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. यासोबतच पंतप्रधान सामन्यानंतर पुरस्कार सोहळ्यात स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यांनी विजेत्या संघाला आयसीसी विश्वचषक 2023 ची ट्रॉफी प्रदान केली.
- काय म्हणाले पंतप्रधान मोदी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करत लिहिलं, 'प्रिय टीम इंडिया, विश्वचषकादरम्यान तुमची प्रतिभा आणि दृढनिश्चय जबरदस्त होता. तुम्ही मोठ्या भावनेनं खेळले. देशाला अभिमान वाटला. आम्ही आज आणि सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत,' अस मोदी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.
- अमित शाहांनी केली पोस्ट : 'आमच्या संघानं संपूर्ण विश्वचषकात उत्कृष्ट खेळ केला आणि संस्मरणीय कामगिरी केली. खर्या खिलाडूवृत्तीमध्ये विजय आणि अपयश या दोन्हींमधून अधिक मजबूत होणं समाविष्ट असते. मला ठाम विश्वास आहे की तुम्ही आणखी मजबूत व्हाल.' असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी भारतीय संघाला प्रोत्साहन दिलंय.
माजी क्रिकेटपटूंनी संघाचं मनोबल उंचावलं :
- भारतीय संघाच्या पराभवानंतर भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर म्हणाला, 'मी म्हटल्याप्रमाणे काहीही झालं तरी आम्ही चॅम्पियन संघ आहोत. तेव्हा मुलांनो शांत व्हा. ऑस्ट्रेलियाचं खूप अभिनंदन.
- भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणनं लिहिलं, 'संपूर्ण विश्वचषकात टीम इंडियासाठी फक्त एकच वाईट दिवस होता. तो होता अंतिम सामना. आमच्या टीमबद्दल प्रेम आणि आदर. यादरम्यान इरफाननं ऑस्ट्रेलियन संघाला विश्वविजेता बनल्याबद्दल शुभेच्छाही दिल्या.
- माजी भारतीय फलंदाज सुरेश रैनानं लिहिलं की, 'माझ्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी हा एक हृदयद्रावक क्षण आहे, परंतु, मी एवढंच म्हणेन की आपला संघ विश्वविजेता बनण्यास पात्र होता. माझी इच्छा होती की आज आमची रात्र असती तर आम्ही हा विजय साजरा करत असतो.
- माजी भारतीय क्रिकेट आणि विश्वविजेता संघाचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं लिहिलं की, 'आमच्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत घेतलेल्या प्रयत्नांसाठी आम्ही आमचं डोकं उंच ठेवू शकतो. संपूर्ण विश्वचषकात त्यांनी आम्हाला अनेक आनंदाचे क्षण दिले. पण दुर्दैवानं अंतिम फेरीत ते चषक उचलू शकला नाही. सेहवागनं ऑस्ट्रेलियाचं अभिनंदनही केले आहे.
शाहरुख खाननही दिलं प्रोत्साहन : 'भारतीय संघानं ही संपूर्ण स्पर्धा ज्या प्रकारे खेळली ती सन्मानाची बाब आहे. या स्पर्धेत त्यांनी खूप उत्साह आणि चिकाटी दाखवली. हा एक खेळ आहे आणि नेहमीच एक किंवा दोन दिवस वाईट असतात. दुर्दैवानं, ते आज घडलं. परंतु, क्रिकेटमधील आमच्या खेळाच्या वारशाचा आम्हाला अभिमान वाटल्याबद्दल टीम इंडियाचे आभार! तुम्ही संपूर्ण भारताला खूप आनंद दिला.' असं म्हणत शाहरुखनं भारतीय संघाला प्रोत्साहन दिलंय.
हेही वाचा :
- करोडो भारतीयांचं स्वप्न भंगलं, ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा जगज्जेता; टीम इंडियाचा दारूण पराभव
- विश्वचषक हारला, पण आपल्या फलंदाजीनं जिंकलं सर्वांचं मन; विराट कोहली 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट'!
- पॅट कमिन्स जे बोलला ते करून दाखवलं, एकाच चेंडूत संपूर्ण स्टेडियम शांत!