लखनऊ Cricket World Cup २०२३ : क्रिकेट विश्वचषकात रविवारी झालेल्या सामन्यात भारतानं गतविजेत्या इंग्लंडला १०० धावांनी धूळ चारत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. मात्र, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ सुरुवातीला अडखळला होता. भारतानं ४० धावांवर तीन विकेट गमावल्या. विश्वचषकाच्या इतिहासात विराट कोहली पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला.
इंग्लंडला १२९ धावांवर ऑलआऊट केलं : यानंतर कर्णधार रोहित शर्मानं आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत भारताचा डाव सावरला आणि १०१ चेंडूत ८७ धावा केल्या. मात्र त्यानंतर एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आलं नाही. प्रथम फलंदाजी करताना भारतानं इंग्लंडसमोर ५० षटकांत २२९ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. तसं पाहिलं तर, इंग्लंडच्या बलाढ्य फलंदाजी समोर हे लक्ष्य किरकोळ होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत इंग्लंडला अवघ्या १२९ धावांवर ऑलआऊट केलं, आणि साहेबांवर १०० धावांनी धमाकेदार विजय मिळवला.
काय म्हणाला वसीम अक्रम : टीम इंडियाच्या या शानदार गोलंदाजीवर आता पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रमही फिदा झाला आहे. अक्रमनं जसप्रीत बुमराहचं खूप कौतुक केलं. वसीम अक्रमनं स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं की, बुमराह जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. अक्रम बुमराहमुळे इतका प्रभावित झाला की त्यानं त्याला त्याच्यापेक्षा चांगला गोलंदाज म्हटलंय. 'बुमराहचं चेंडूवरील नियंत्रण माझ्यापेक्षा बरंच चांगलं आहे. तो सर्व प्रकारचे चेंडू टाकू शकतो. त्याच्या गोलंदाजी आक्रमणात विविधता आहे. तो पूर्ण गोलंदाज आहे', असं अक्रमनं सांगितलं.
जसप्रीत बुमराहचा शानदार कमबॅक : दुखापतीमुळे सुमारे एका वर्षानंतर पुनरागमन करत असलेला जसप्रीत बुमराह या वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. त्यानं इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी करत ३ बळी घेतले. वर्ल्ड कप २०२३ मधील टॉप ५ गोलंदाजांच्या यादीत बुमराह १४ विकेट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम झम्पा १६ विकेट्ससह सध्या अव्वल स्थानावर आहे.
हेही वाचा :
- Cricket World Cup २०२३ : भारतानं साहेबांची जिरवली, 'विश्वविजेते' स्पर्धेतून बाहेर!