शिमला (धर्मशाळा) Cricket World Cup 2023 : टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या दुखापतीमुळं आधीच या सामन्यातून बाहेर पडलाय. त्यातच आता तुफानी फलंदाज सूर्यकुमार यादवलाही सरावादरम्यान दुखापत झाल्याची माहिती समोर आलीय. तसंच ईशान किशनलाही मधमाशीनं चावा घेतल्यामुळं त्याचीही प्रकृती बिघडल्याचं समोर आलंय. यामुळं भारतीय संघाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दुखापतीचं कारण काय :भारतीय फलंदाज सूर्या हा संघाचा थ्रो डाउन स्पेशालिस्ट रघुसोबत नेटमध्ये सराव करत होता. तेव्हा त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. यानंतर सूर्यानं त्यावर पट्टी बांधली. तसंच मैदानातून बाहेर पडताना त्याला जास्त दुखापत झाली नसल्याचं दिसलं. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, दुखापतीमुळं सूर्याचं आजच्या सामन्यात खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. यामुळं न्यूझीलंडविरुद्धचा सामना ईशान आणि सूर्यासाठी खेळणं कठीण दिसत आहे. मात्र, याबाबत अद्याप टीम इंडियाच्या निवड समितीकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. दुखापतीमुळं स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या याआगोदर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडलाय. अशातच परिस्थितीत सूर्यकुमार आणि ईशानला दुखापत होऊ नये, असं संघ व्यवस्थापनाला वाटत होतं. मात्र आता या दोघांच्या दुखापतीमुळं प्लेइंग इलेव्हन निवडण्यात अडचणी येऊ शकतात.