अहमदाबाद Cricket World Cup 2023 SA vs AFG : यंदाच्या क्रिकेट विश्वचषकातील 42 वा सामना आज दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना 16 नोव्हेंबर रोजी होणार्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापुर्वी सरावासारखा असेल. दुसरीकडं, अफगाणिस्तानला हा सामना जिंकून आपल्या यंदाच्या अविस्मरणीय विश्वचषक मोहिमेला अलविदा करायचा प्रयत्नात असणार आहे.
उपांत्य फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तानसमोर अशक्यप्राय आव्हान : अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत अजूनही आहे. पण, अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना आफ्रिका संघाचा तब्बल 438 धावांनी पराभव करावा लागेल, जे जवळपास अशक्य आहे. अशा परिस्थितीत आजचा सामना अफगाणिस्तान संघासाठी या विश्वचषकातील शेवटचा सामना असू शकतो. अफगाणिस्तान संघानं या विश्वचषकात 8 पैकी 4 सामने जिंकून चमकदार कामगिरी केली. त्यांनी इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना पराभूत केलंय. ऑस्ट्रेलियाविरुद्धही ते मोठ्या विजयाच्या जवळ होते. पण, मॅक्सवेलनं कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला. दुसरीकडं या विश्वचषकात दक्षिण आफ्रिका चॅम्पियनप्रमाणं खेळलाय. त्यांनी 8 पैकी 6 सामने जिंकत आपली दावेदारी मजबूत केलीय.
- उभय संघांमध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर आत्तापर्यंत उभय संघांमध्ये केवळ एकच एकदिवसीय सामना खेळला गेला. ज्यात आफ्रिकेनं बाजी मारलीय तर अफगाणिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे.