हैदराबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यामध्ये सर्वांच्या नजरा फॉर्मात असलेला भारतीय कर्णधार रोहित शर्मावर असतील. अफगाणिस्तानविरुद्ध नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रोहितनं धमाकेदार १३१ धावांची खेळी केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० हून अधिक एकदिवसीय धावा करणाऱ्या रोहितनं वेळोवेळी आपल्या शॉट सिलेक्शनमध्ये सुधारणा केली आहे.
रोहित कोणताही शॉट परफेक्शननं खेळू शकतो : रोहित मैदानावर विविध प्रकारचे शॉट्स खेळण्यास सक्षम आहे. पुल असो, कट असो, फ्लिक किंवा स्ट्रेट ड्राईव्ह, रोहित कोणताही शॉट परफेक्शननं खेळू शकतो. भारताचे माजी खेळाडू आणि क्रिकेट व्यवस्थापक लालचंद राजपूत यांनी २००७ च्या पहिल्या टी २० विश्वचषकात तरुण रोहित शर्माला खेळताना पाहिलं होतं. ते टी २० फॉरमॅटनुसार रोहितच्या शॉट सिलेक्शनमधील सुधारणेबद्दल सांगतात.
अनेक खेळाडूंनी शॉट्स सिलेक्शनमध्ये सुधारणा केली : लालचंद राजपूत यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं की, टी २० फॉरमॅटमुळे अनेक खेळाडूंनी त्यांच्या शॉट्स सिलेक्शनमध्ये सुधारणा केली. यामुळे ते अधिक सकारात्मक खेळत आहेत. रोहित शर्माकडे कौशल्य होतं. त्याच्याकडे खूप वेळ होता. आता त्यानं त्याच्या शॉट सिलेक्शनमध्ये सुधारणा केली आहे, असं राजपूत यांनी झिम्बाब्वेमधून 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
रोहितचं शॉट सिलेक्शन सातत्यपूर्ण आहे : ते पुढे म्हणाले की, रोहितची शॉट्सची निवड अधिक सातत्यपूर्ण आहे. त्यामुळेच त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं, कसोटी क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या आणि टी २० क्रिकेटमध्येही शतकं झळकावली आहेत. एक फलंदाज म्हणून सुधारणा करत राहण्यासाठी तुम्हाला तुमचं शॉट सिलेक्शन सुधारणं महत्त्वाचं असतं. तुम्ही अष्टपैलू फलंदाज असणं आवश्यक आहे. तुम्ही केवळ एका बाजूनं खेळू शकत नाही. तुम्ही पुल शॉटसह लॉफ्टेड शॉट खेळणही आवश्यक आहे. यामध्ये रोहितनं कमालीचं प्रभुत्व मिळवलंय, असं राजपूत यांनी स्पष्ट केलं.
वर्ल्डकप टीममध्ये सिलेक्शन न होणं धक्कादायक होतं : रोहित शर्मा मैदानावर इच्छेनुसार षटकार आणि चौकार मारतो. त्यासाठी तो पुल शॉट आणि लॉफ्ट शॉटचा अधिक वापर करतो. याबद्दल बोलताना रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड म्हणाले की, 'रोहितनं क्रिकेटला खूप वेळ दिलाय. त्यामुळे त्याचा विकास झाला. २००९ ते २०११ दरम्यान रोहितचा बॅड पॅच होता. तेव्हा त्यानं क्रिकेटसाठी पुरेसा वेळ दिला नाही. वर्ल्डकपच्या टीममध्ये सिलेक्शन न होणं त्याच्यासाठी धक्कादायक होतं. पण त्यानंतर जेव्हा मी त्याला समजावलं तेव्हा त्यानं क्रिकेटकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. आता त्याचे परिणाम दिसू शकतात', असं लाड म्हणाले. दिनेश लाड यांनी टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरलाही प्रशिक्षण दिलं आहे.
वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न आहे : लाड यांच्या मते, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं रोहितला २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ओपनिंग करण्यास सांगितलं. त्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला. रोहित, ज्यानं सहा आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत (पाच मुंबई इंडियन्ससह आणि एक डेक्कन चार्जर्ससह), अद्याप एकही एकदिवसीय वर्ल्डकप जिंकलेला नाही. शनिवारी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून त्याला आपल्या या स्वप्नाच्या आणखी जवळ जायचं आहे.
हेही वाचा :
- Cricket In Olympics : ऑलिम्पिकमध्ये १२८ वर्षांनंतर दिसणार क्रिकेटचा थरार, २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये टी २० क्रिकेटचा समावेश
- Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात रोहितची गाडी सुसाट! सर्वाधिक शतक, सर्वाधिक षटकार; जाणून घ्या किती रेकॉर्ड मोडले