नवी दिल्ली Cricket World Cup 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने आज ऑक्टोबर २०२३ च्या 'प्लेअर ऑफ द मंथ' (महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू) पुरस्काराची घोषणा केली. न्यूझीलंडचा डावखुरा फलंदाज रचिन रवींद्रनं विश्वचषक स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीनंतर पहिल्यांदाच हा पुरस्कार जिंकला. तर ऑस्ट्रेलियात टी २० मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूला महिला खेळाडूंमध्ये 'प्लेअर ऑफ द मंथ'चा पुरस्कार मिळाला.
चालू विश्वचषकात दमदार कामगिरी : रचिन रवींद्रनं चालू विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी केली आहे. त्याच्या या कामगिरीच्या बळावर त्याला प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. विशेष म्हणजे, या विश्वचषकापूर्वी तो केवळ १२ एकदिवसीय सामने खेळला होता. त्यानं विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध शानदार शतक झळकावून लोकांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर नेदरलँड्स विरुद्ध (५१) आणि भारताविरुद्ध (७५) आपली उत्कृष्ट कामगिरी सुरूच ठेवली. त्यानंतर धर्मशाला येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या रोमहर्षक सामन्यातही त्यानं शानदार शतक झळकावलं. त्यानं ८९ चेंडूत ११६ धावा ठोकल्या. विश्वचषकात रवींद्रनं आतापर्यंत ८१.२० च्या सरासरीनं ४०६ धावा केल्या आहेत.