चेन्नई Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकातील २६ वा साखळी सामना आज दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
बाबर आझमचं अर्धशतक : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या ४६.४ षटकांत सर्वबाद २७० धावा झाल्या. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात तंबूत परतले. मात्र त्यानंतर आलेल्या कर्णधार बाबर आझमनं टीमला सांभाळलं. त्यानं ६१ चेंडूत शानदार ५० धावा ठोकल्या. त्याला दुसऱ्या टोकावरून मोहम्मद रिझवाननं उत्तम साथ दिली. रिझवानं २७ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. तळाचा फलंदाज शादाब खाननं ३६ चेंडूत ४३ धावांचं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेडून तबरेझ शम्सीनं ६० धावा देत ४ बळी घेतले.
मार्करमच्या ९१ धावा : लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं सावध सुरुवात केली. कर्णधार टेंम्बा बवुमानं २८ धावा केल्या, तर डी कॉक २४ धावा करून बाद झाला. आज एडन मार्करम फॉर्ममध्ये दिसला. त्यानं ९३ चेंडूत ९१ धावा करत संघाला विजयाच्या समीप नेलं. मात्र तो बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ ढेपाळला. अखेरच्या क्षणात मॅच अत्यंत रोमांचक अवस्थेत पोहचली होती. शेवटी केशव महाराज आणि तबरेझ शम्सीनं संयमानं खेळत विजयाची रेषा पार केली. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीनं ४५ धावा देत ३ बळी घेतले.