चेन्नई Cricket World Cup २०२३ : विश्वचषक २०२३ च्या २२ व्या सामन्यात आज पाकिस्तान समोर अफगाणिस्तानचं आव्हान होतं. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या ५० षटकांत २८२-७ धावा झाल्या.
बाबर आझमचं अर्धशतक : प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं चांगली सुरुवात केली. सलामीवीर अब्दुल्ला शफीकनं चांगली फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. तो ७५ धावांत ५८ धावा करून बाद झाला. नूर अहमदनं त्याला पायचित केलं. दुसरा सलामीवीर इमाम उल हक १७ धावा करून परतला. त्यानंतर आलेला कर्णधार बाबर आझम या विश्वचषकात पहिल्यांदा लयीत दिसला. त्यानं एका टोकानं किल्ला लढवत ९२ चेंडूत ७४ धावा काढल्या. इफ्तिखार अहमद आणि शदाब खान यांनी ४०-४० धावांचं योगदान दिलं. पाकिस्ताननं ५० षटकांत ७ गडी गमावून २८२ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून नूर अहमदनं ४९ धावा देत ३ बळी घेतले.
सहज लक्ष्य गाठलं : पाकिस्ताननं दिलेल्या २८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या ओपनर्सनं धमाकेदार सुरुवात केली. रहमानउल्ला गुरबाजनं ५३ चेंडूत ६५ धावा ठोकल्या, तर इब्राहिम झदरननं ११३ चेंडूत ८७ रन्स केले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी दमदार शतकीय भागेदारी केली. हे दोघं बाद झाल्यानंतर रहमत शाह आणि कर्णधार हशमतुल्ला शाहिदी यांनी सामन्याची सुत्र आपल्या हाती घेतली. या दोघांनी पाकिस्तानी गोलंदाजी चोपून काढत संघाला सहज विजय मिळवून दिला. रहमतनं ८४ चेंडूत ७७ धावा केल्या, तर शाहिदीनं ४५ चेंडूत ४८ धावांचं योगदान दिलं. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि हसन अलीनं १-१ विकेट घेतली.