पुणे Cricket World Cup 2023 NZ vs SA : क्रिकेट विश्वचषकातील आजच्या दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसलाय. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यातून बाहेर पडल्याचं न्यूझीलंड क्रिकेटनं मंगळवारी जाहीर केलंय. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आज न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात या स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाची माहिती : या सामन्यात नियमित कर्णधार केन विल्यमसनही खेळणार नसल्याचे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं आपल्या X (पुर्वीचं ट्विटर) हँडलवर पोस्ट केलंय. आपल्या पोस्टमध्ये बोर्डानं, केन विल्यमसनला बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आलंय. विल्यमसननं गेल्या दोन दिवसांत नेटमध्ये फलंदाजी केली आहे, मात्र उद्याच्या सामन्यात तो पुनरागमन करू शकत नसल्याचं स्पष्ट केलंय.
यंदाच्या विश्वचषकात खेळला एकच सामना : विल्यमसननं गेल्या दोन दिवसांत नेटमध्ये बरीच फलंदाजी केली, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी तो संघात स्थान मिळवू शकला नाही. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानविरुद्धच्या संघाच्या पुढील सामन्यापूर्वी विल्यमसनच्या उपलब्धतेचं पुनर्मूल्यांकन केलं जाईल. विल्यमसनला या स्पर्धेत केवळ एकच सामना खेळता आलाय. या स्पर्धेच्या सुरुवातीलाही तो संघासाठी उपलब्ध नव्हता.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात झाली दुखापत : IPL 2023 मध्ये गुडघ्याला दुखापत झाल्यानंतर, त्यानं 2023 च्या विश्वचषकाच्या मध्यभागी पुनरागमन केलं आणि 13 ऑक्टोबर रोजी बांग्लादेशविरुद्धच्या साखळी सामन्यात खेळला. कर्णधार असताना त्यानं संघाला 8 गडी राखून विजय मिळवून दिला आणि 78 धावांची शानदार खेळी खेळली. मात्र, या सामन्यादरम्यान त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली, त्यामुळं तो पुढील काही सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. परंतु, आता तो लवकरच संघात पुनरागमन करू शकतो.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक : न्यूझीलंडचा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. या संघानं स्पर्धेत सलग चार सामने जिंकले आहेत. मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानं त्यांची विजयी मालिका थांबली. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी न्यूझीलंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा आजचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणं आवश्यक आहे. न्यूझीलंडनं आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, ज्यात चार जिंकले असून त्यांचे 8 गुण आहेत. अशा स्थितीत उपांत्य फेरी गाठण्यासाठी किवी संघाला येथून प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक झालंय. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दमदार फॉर्ममध्ये आहे. अशा स्थितीत न्यूझीलंडसमोर पुण्यात खडतर आव्हान असणार आहे.
हेही वाचा :
- Sachin Tendulkars Life Size Statue : महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं 'वानखेडे'वर होणार अनावरण, अनेक दिग्गज राहणार उपस्थित
- World Cup 2023 : विराटन कोहलीनं सचिन तेंडुलकरच्या 'या' लाजिरवाण्या विक्रमाची केली बरोबरी
- Ajay Ratra Interview : पंड्याला दुखापत झाल्यानं रोहित-विराटनं एकत्र विश्वचषकात सहाव्या गोलंदाजाची भूमिका निभवावी : अजय रात्रा