चेन्नई Cricket World Cup 2023 NZ vs AFG :गतविजेत्या इंग्लंडला पराभूत करून अफगाणिस्ताननं विश्वचषकातील सर्व संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. त्यामुळं आज होणाऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला कमी समजण्याची चूक न्यूझीलंड करणार नाही. पहिल्या दोन सामन्यात बांगलादेश आणि भारताकडून अफगाणिस्तानचा पराभव झाला होता. मात्र तिसऱ्या सामन्यात हशमतुल्ला शाहिदीच्या संघानं इंग्लंडसारख्या बलाढ्या संघाला पराभूत करून नवा इतिहास रचला.
टॉम लॅथम पुन्हा करणार नेतृत्व :न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसनच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यामुळं तो काही सामन्यांतून बाहेर पडला. त्यामुळं न्यूझीलंडचं नेतृत्व पुन्हा एकदा यष्टिरक्षक फलंदाज टॉम लॅथम करणार आहे. आयपीएलदरम्यान झालेल्या एसीएलच्या दुखापतीमुळं पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर पडलेला विल्यमसन बांगलादेशविरुद्ध ७८ धावा केल्यानंतर अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळं बाहेर पडला होता. त्याच्या अनुपस्थितीतही चमकदार कामगिरी करणाऱ्या न्यूझीलंड संघाला सलग चौथा विजय नोंदवण्यासाठी चांगला खेळ कारावा लागणार आहे.
न्युझीलंडसमोर फिरकीचं आव्हान : न्युझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी अंगठ्याच्या दुखापतीतून सावरला आहे. तो या सामन्यात खेळू शकतो की नाही हे अजूनही अस्पष्ट आहे. न्यूझीलंडकडे विल यंग, डेव्हॉन कॉनवे आणि डॅरिल मिशेलसारखे फलंदाज सध्या फॉर्ममध्ये आहेत. तर अष्टपैलू रचिन रवींद्रनंही आपल्या कामगिरीनं सर्वांना प्रभावित केलंय. आता त्यांना रशीद खान, मुजीब-ऊर-रहमान आणि मोहम्मद नबी यांच्या फिरकीचा सामना करावा लागेल. चेपॉकच्या टर्निंग विकेटवर हे फिरकीचं त्रिकूट न्यूझीलंडच्या फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतं.